
गणेश माळवे
दीव ः पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्स स्पर्धेत पिंच्याक सिलॅट खेळात महाराष्ट्र राज्याने ३ सुवर्ण, ४ रौप्य आणि ५ कांस्य अशी १२ पदकांची कमाई करुन स्पर्धा गाजवली.
क्रीडा मंत्रालय भारत सरकार व दीव दमन दादर नगर हवेली सरकार यांच्या वतीने दीवच्या घोघला बीच समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्स स्पर्धेत महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट संघाने शानदार कामगिरी नोंदवली.

पिंच्याक सिलॅट खेळात १५ खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली होती. एकूण ८ खेळांचा यामध्ये समावेश होता. या स्पर्धेत बीच सॉकर, बीच कबड्डी, बीच व्हॉलिबॉल, बीच सेपक टकरा, बीच पिंच्याक सिलॅट, सागरी जलतरण, रस्सीखेच, मलखांब या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. पिंच्याक सिलॅट खेळ प्रकाराने ३ सुवर्ण, ४ रौप्य, ५ कांस्य पदके अशी एकूण १२ सर्वाधिक पदके जिंकून खेळाडूंनी महाराष्ट्र संघाला गुणतालिकेत टॉप २ मध्ये ठेवले. तसेच ओपन वॉटर स्विमिंग खेळ प्रकाराने २ सुवर्ण, १ रौप्य, २ कांस्य पदके अशी एकूण ५ पदके जिंकून उत्कृष्ट कामगिरी केली. पिंच्याक सिलॅट संघाचे व्यवस्थापक म्हणून शंकर भास्करे तर प्रशिक्षक म्हणून ओम शिंदे, आशिता यादव यांनी काम पाहिले.
पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी महाराष्ट्र पथक प्रमुख आणि क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे, दीव दिमन दादर नगर हवेली क्रीडा अधिकारी अक्षय कोटलवार, महाराष्ट्र क्रीडा अधिकारी अरुण पाटील, शंकर भास्करे, पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, अनिता कदम, नेहा साप्ते, गणेश माळवे, स्वाती बेने आदी उपस्थित होते.
पदक विजेते खेळाडू
सुवर्ण पदक : रिया चव्हाण ,प्राजक्ता जाधव, वैभव काळे, जयश्री शेट्ये.
रौप्य पदक ः रामचंद्र बदक, सचिन गर्जे, ओमकार अभंग, वैभव काळे, अंशुल कांबळे.
कांस्य पदक : किरणाक्षी येवले, वैभव काळे, कृष्णा पांचाळ, मुकेश चौधरी, सम्यक मार्कंडेय.