
गणेश माळवे
दीव ः महाराष्ट्र शासन व क्रीडा विभाग खेळाडूंच्या सदैव पाठीशी उभे आहे. खेळाडूंनी आपली प्रगती करत राहावे. खेलो इंडिया बीच गेम्स ही स्पर्धा खेळाडूंसाठी एक पर्वणी होती असे मत क्रीडा उपसंचालक व पथक प्रमुख नवनाथ फरताडे यांनी व्यक्त केले.

केंद्र सरकारच्या माध्यमातून खेळाडूंना शालेय स्तरावर स्कूल गेम्स, त्यानंतर खेलो इंडिया युथ गेम्स, खेलो इंडिया बीच गेम्स अशा विविध क्रीडा स्पर्धा खेळून पुढील ऑलिम्पिक स्पर्धेसाठी चांगले खेळाडू निर्माण होत आहेत. दीव दमन दादर नगर हवेली सरकारने अतिशय उत्कृष्ट खेलो इंडिया बीच गेम्सचे आयोजन केले आहे. खेळाडूंची भोजन आणि निवास व्यवस्था उत्तम दर्जाची होती. खेळाडूंना बीच क्रीडा स्पर्धेचा आनंद मिळाला.
महाराष्ट्र राज्य संघाची कामगिरी लक्षवेधक ठरली आहे. पिंच्याक सॅलेट खेळात १२ पदके, बीच कबड्डी स्पर्धेत २ पदके, स्विमिंगमध्ये ५ पदके, तर सॉकर खेळात १ पदक अशी एकूण २० पदके प्राप्त करून महाराष्ट्र संघ उपविजेता ठरला. ही कामगिरी निश्चितच आशादायक आहे असे क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे यांनी सांगितले.
राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, क्रीडा आयुक्त हीरालाल सोनावणे, क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने पहिल्या खेलो इंडिया बीच स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले आहे.