
अधिसभा सदस्यांना चौकशीस बोलावले नसल्यामुळे सत्य उघडकीस नाही
खेळाडूंना आखूड ब्लेझर शिवल्याचे प्रकरण
सोलापूर ः पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेत खेळाडूंना आखूड ब्लेझर शिवल्याच्या प्रकरणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेत गठीत झालेली समिती डावलून कुलगुरूंनी स्वतःच्या अधिकारात सत्यशोधन समिती नेमली होती. खेळाडू, व्यवस्थापक व संवैधानिक अधिकारी अशा १०९ जणांपैकी एकाचीही तक्रार आली नसल्याचा अहवाल क्रीडा संचालकाने दिल्यामुळे या समितीने कोणालाही जबाबदार धरले नाही. परंतु, ज्या अधिसभा सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला त्या सदस्यांना चौकशीस न बोलावून हा प्रश्न सत्यशोधन समितीने निकाली काढला आहे.
खेळाडूंनी तक्रार का दिली नाही, याचा अधिसभा सदस्य ए बी संगवे यांच्याकडून समिती सदस्यांना खुलासा मिळाला असता. तसेच अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य सचिन गायकवाड यांनीही अधिसभेत आखूड ब्लेझर शिवल्याचे सांगितले होते आणि तेही प्रशिक्षक म्हणून लाभार्थी होते. त्यांनाही समितीने बोलावले नाही. दोघांपैकी एकालाही बोलावले असते तर सत्यशोधन समितीसमोर सत्य उघडकीस आले असते. तसेच ज्या खेळाडूंना ब्लेझर मिळाले आहेत त्या महाविद्यालयाला किंवा शारीरिक शिक्षण संचालकांना पत्र पाठवून याची माहिती घ्यावी अशी शिफारस केली नसल्याचे समितीच्या अहवालावरून स्पष्ट होते
समिती बदलण्याचा कुलगुरूंचा निर्णय संशयास्पद
अधिसभेत सभेत चर्चा करून झालेली समिती कुलगुरू स्वतःच्या अधिकारात हीच सत्यशोधन समिती ठेवू शकले असते. परंतु त्यांनी समिती बदलली. त्यामुळे कुलगुरूंचा हा निर्णय संशयास्पद वाटतो. त्यामुळे पुरवठादार मेसर्स छत्रपती संभाजीराजे स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित सोलापूर यांना ते पाठीशी घालत आहेत का? असा संशय निर्माण होतो
अधिसभेत अशी समिती होती
प्र-कुलगुरू लक्ष्मीकांत दामा, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा सचिन गायकवाड व अधिसभा सदस्य सदस्य ए बी संगवे.
कुलगुरूंनी अशी नियुक्ती केली समिती
मानव विज्ञान विद्याशाखा प्र-अधिष्ठाता, डॉ कोरे वसंत गुरुशांत, डॉ कोळेकर तानाजी नारायण (डी बी एफ दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर), डॉ आवताडे हनुमंत कृष्णा (शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज).
कुलगुरूंनी आखूड ब्लेझरला दुजोरा दिला होता
याबाबत कुलगुरू प्रा महानवर यांना एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता त्यांनी अशी माहिती दिली होती की, प्रश्नोत्तराच्या तासात झालेली समिती ही नियमाप्रमाणे गठीत होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही प्रशासकीय समिती नेमली आहे. त्यांच्याकडून माहिती घेतली असता काही ब्लेझर आखूड झाले होते, काही अदलाबदली झाली होती. याची कार्यवाही संबंधित ठेकेदाराने केली आहे.
संवैधानिक अधिकाऱ्यांनाही ब्लेझर
आंतर विद्यापीठ स्पर्धेत कामगिरी केलेल्या प्राविण्य प्राप्त ८२ खेळाडू, २१ मॅनेजर व प्रशिक्षक यांना २९ ऑगस्ट २०२४ या क्रीडा दिनी झालेल्या कार्यक्रमात ब्लेझर दिले होते. परंतु संवैधानिक अधिकाऱ्यानीही यात हात धुवून घेतला आहे. समितीला क्रीडा संचालकांनी दिलेल्या अहवालानुसार ६ संवैधानिक अधिकाऱ्यांनीही ब्लेझर घेतल्याचे समोर आले आहे.
तक्रार केल्यास खेळाडूंचे करिअर धोक्यात
खेळाडूंनी तक्रार केली असती तर त्या खेळाडूंचा पुढील वर्षी विद्यापीठ संघ निवडीवर परिणाम होतो. आमचे नाव विद्यापीठात सांगू नका, आमचे खेळाडू करिअर धोक्यात येते, असे सांगून आखूड ब्लेझर शिवलेल्या खेळाडूंनी माझ्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे हा प्रश्न मी अधिसभेत उपस्थित केला होता
- ए बी संगवे, अधिसभा सदस्य