
माजी महापौर मनोहर सपाटे यांचे प्रतिपादन
सोलापूर ः ऐतिहासिक व सांस्कृतिक कला क्रीडा प्रकार जपले पाहिजेत आणि वाढविले पाहिजे. शिवकालीन पारंपरिक क्रीडा प्रकारांना राजाश्रय मिळाला पाहिजे. अन्य क्रीडा प्रकाराप्रमाणे याही खेळांना शासनाने मान्यता दिली पाहिजे. अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन हे स्तुत्य असून सर्वच शाळा व महाविद्यालयात याचे आयोजन झाले पाहिजे, असे प्रतिपादन माजी महापौर मनोहर सपाटे यांनी केले.

मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी शिक्षण संकुल व रुद्र शक्ती गुरुकुल बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन मर्दानी क्रीडा प्रकार शिबिराचे आयोजन छत्रपती शिवाजी शिक्षण संकुल येथे करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी रुद्र शक्ती गुरुकुलचे अध्यक्ष योगनाथ फुलारी, प्रा महेश माने, प्रा संतोष गवळी, सकल मराठा समाज समन्वयक माऊली पवार, विद्यापीठ सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा सचिन गायकवाड, क्रीडा शिक्षक मारुती घोडके, नितीन गोरे, दत्ता सुतार, दत्ता भोसले, प्रशांत राणे व प्रशांत जाधव आदी उपस्थित होते. या शिबिरामध्ये ११० विद्यार्थ्यांनी नावे नोंदवली असून मुख्य प्रशिक्षक म्हणून विवेक मिस्कीन व त्यांचे सहकारी मार्गदर्शन करीत आहेत.