
बुलढाणा ः बुलढाणा येथे आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत माईंड चेस अकॅडमीच्या खेळाडूंनी लक्षवेधक कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले.
गुरुकुल ज्ञानपीठ धाड रोड, बुलढाणा येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतून राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी बुलढाणा संघाची निवड करण्यात आली. या स्पर्धेत माईंड चेस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी बजावली.
या स्पर्धेत अकॅडमीच्या शाश्वत शिवाजी देशमुख याने ६ पैकी ५.५ गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. भावेश अग्रवाल याने ६ पैकी ४.५ गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. याच गटात मुलींमध्ये अनघा विनय केळकर हिने ३ पैकी ३ गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवला.

११ वर्षांखालील गटात संस्कार मंगेश शिरसाट याने ५ पैकी ४ गुण घेऊन द्वितीय क्रमांक मिळवला. १३ वर्षांखालील गटात शर्वरी शिवाजी देशमुख हिने ४ पैकी ३ गुण घेऊन दुसरा क्रमांक मिळवला. याच गटात सुविरा मंगेश शिरसाट हिने ४ पैकी ३ गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
१५ वर्षांखालील गटात ईशांत संदीप घट्टे याने ५ पैकी ५ गुण मिळवून विजेतेपद पटकावले. १७ वर्षांखालील गटात आदित्य रुपेश खंडारे याने तिसरा क्रमांक मिळवला. १९ वर्षांखालील गटात मुलींमधून वेदांती शिवाजी देशमुख हिने प्रथम क्रमांक मिळवला तर तनुश्री टिकार हिने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच खुल्या महिला गटात शुभांगी शिवाजी देशमुख यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. याव्यतिरिक्त अथर्व केळकर, अनय धारपवार, ओम शिरसाट, राजश्री हिवाळे, धनश्री पडोळ, अर्णब चव्हाण, शौर्य गवई, प्रणश्री पडोळ इत्यादी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
तसेच सर्वात कमी वयामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून इंटरनॅशनल फिडे रेटिंग मिळवल्याबद्दल दीपक चव्हाण (आयए) यांच्याकडून संस्कार मंगेश सिरसाट याचा सत्कार करण्यात आला. जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे (बुलढाणा चेस सर्कल) विजेत्या खेळाडूंची निवड राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेकरिता करण्यात आली. बुद्धिबळ कोच आणि राष्ट्रीय बुद्धिबळ पंच व स्कूल ईन्स्ट्रक्टर अमोल इंगळे यांचे या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले आहे. जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष सतिष राठी व सचिव अंकुश रक्ताडे यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.