
शिरपूर ः शिरपूर येथे सुरू झालेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत जळगाव संघाने रत्नागिरी संघाचा ६-० असा मोठा पराभव करुन विजयी सलामी दिली.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन मुंबई व धुळे जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरजिल्हा १४ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेल शिरपूर येथील मिलिटरी हायस्कूल येथे सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा पहिला सामना रत्नागिरी जिल्ह्या सोबत झाला. या सामन्यात जळगाव संघाने वर्चस्व गाजवत ६ गोल मारून विजय नोंदविला. २६ मे रोजी जळगाव संघाचा सामना रायगड जिल्ह्याशी होणार आहे.
रत्नागिरी संघाविरुद्ध झालेल्या लढतीत जळगाव संघाच्या बिलाल शेख याने २ तर,रशीद शेख, पार्थ पाटील, अंश आव्हाड व अर्णव पाटील यांनी प्रत्येकी एक गोल करून जळगाव संघास मोठा विजय मिळवून दिला.
या संघासोबत प्रशिक्षक म्हणून असलेले सेंट्रल रेल्वे भुसावळचे सीटीई नितीन डेव्हिड व व्यवस्थापक वसीम रियाज यांचे खेळाडूंना मार्गदर्शन मिळत आहे. जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख, कार्याध्यक्ष डॉ अनिता कोल्हे, वरिष्ठ उपाध्यक्ष जफर शेख व इम्तियाज शेख आदींनी खेळाडूंचे दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले आहे.