
क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान
गणेश माळवे
दीव ः दीवच्या घोघला बीचवर पार पडलेल्या पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्स स्पर्धेत महाराष्ट्राने ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि १० कांस्य पदके जिंकली व महाराष्ट्र संघाने उपविजेता चषक पटकावला.
पिंच्याक सिलॅट हा महाराष्ट्रासाठी सर्वात जास्त यशस्वी खेळ ठरला, ज्यात ३ सुवर्ण, ४ रौप्य आणि ५ कांस्य पदक अशी एकूण १२ पदके मिळाली. त्यामुळे राज्याला पदक तालिकेत पहिल्या दोन स्थानांमध्ये येण्यास मोठा हातभार लागला.
महाराष्ट्राकडे एक रौप्य पदक कमी असल्याने सर्वसाधारण विजेतेपद हुकले. ओपन वॉटर स्विमिंगमध्येही उत्कृष्ट कामगिरी करत २ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य अशी एकूण ५ पदके महाराष्ट्राने पटकावली. याशिवाय, बीच कबड्डीमध्ये २ कांस्यपदके आणि बीच सॉकरमध्ये १ कांस्यपदक मिळवत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले.

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या संघाला दीव येथे झालेल्या खेलो इंडिया बीच गेम्समध्ये सर्वसाधारण उपविजेतेपदाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे क्रीडा उपसंचालक नवनाथ फडतरे, महाराष्ट्र पिंच्याक सिलॅटचे मुख्य प्रशिक्षक व राष्ट्रीय अध्यक्ष इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे किशोर येवले, क्रीडा अधिकारी अक्षय कोटलवार, अरुण पाटील व महाराष्ट्राचे खेळाडू हे चषक घेण्यास उपस्थित होते. महाराष्ट्र संघाचे कौतुक व अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे.