
मुंबई : टेनिस बॉल क्रिकेट लीग असलेल्या इंडिया कप स्पर्धेच्या काउंटडाऊनला सुरवात झाली आहे. मंगळवारपासून (२७ मे) सुरू होणारी ही लीग गुजरातमधील जॅमसन क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहे.
टेनिस क्रिकेट डॉट इन आणि जेव्हीए ब्रदर्स यांनी आयोजित या लीगची संकल्पना त्याचे मालक संतोष नाणेकर आणि विजय अग्रवाल यांची आहे. टेनिस बॉल क्रिकेटला नवीन उंचीवर नेण्याच्या ध्येयासाठी इंडिया कपचे आयोजन केले जात आहे.
इंडिया कपचे लीग-कम-नॉकआउट असे स्वरूप आहे. विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे १२ संघ सहभागी होतील. त्यात, महाराष्ट्र स्मार्ट नेट, पश्चिम बंगाल द डीजे इलेव्हन, दिल्ली, उत्तराखंड धमाका क्लब, केरळ सुलतान ब्रदर्स, गुजरात बालाजी क्लब राजकोट, डी टाइम टायगर्स ऑफ नॉर्थ ईस्ट, महाराष्ट्र बी टर्फ ॲडिक्ट्स, उत्तर प्रदेश टायगर इलेव्हन, अमर साई, बिहार पीव्हीआर करीम इलेव्हन, पंजाब आणि हरियाणा एमयूसीसी, तामिळनाडू मॅक्सिमस, मध्य प्रदेश आणि राजस्थान शिवन्या इलेव्हन आदी संघांचा समावेश आहे.
यू ट्यूबवर २० लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स, फेसबुकवर १५ लाखांहून अधिक फॉलोअर्स, इंस्टाग्रामवर ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आणि ट्विटरवर २०० हजारांहून अधिक फॉलोअर्स इंडिया कपचे आहेत. इंडिया कप लीग अधिकृतपणे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगशी (आयएसपीएल) संलग्न आहे.थेट प्रक्षेपण Tenniscricket.in च्या यू ट्यूब चॅनेलवर केले जाईल. या स्पर्धेला दररोज ८,००० किकेटप्रेमी उपस्थित राहतील.