< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); हैदराबादचा केकेआर संघावर ११० धावांनी मोठा विजय  – Sport Splus

हैदराबादचा केकेआर संघावर ११० धावांनी मोठा विजय 

  • By admin
  • May 25, 2025
  • 0
  • 36 Views
Spread the love

हेनरिक क्लासेनचे धमाकेदार शतक, हेडची तुफानी फलंदाजी 

दिल्ली : हेनरिक क्लासेन (नाबाद १०५), ट्रॅव्हिस हेड (७६), जयदेव उनाडकट (३-२४), हर्ष दुबे (३-३४) यांच्या प्रभावी कामगिरीच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल स्पर्धेतील शेवटचा सामना खेळताना गतविजेत्या केकेआर संघावर ११० धावांनी विजय नोंदवला. हैदराबाद संघाचा हा सहावा विजय ठरला तर केकेआर संघाचा सातवा पराभव ठरला. 

गतविजेत्या केकेआर संघासमोर विजयासाठी २७९ धावांचे आव्हान होते. केकेआर संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. क्विंटन डी कॉक अवघ्या ९ धावांवर बाद झाला. सुनील नरेन याने १६ चेंडूत ३१ धावांची जलद खेळी साकारली. त्याने तीन चौकार व तीन षटकार मारले. कर्णधार अजिंक्य रहाणे ८ चेंडूत १५ धावा फटकावून बाद झाला. त्याने तीन चौकार मारले. रिंकू सिंग (९) व आंद्रे रसेल (०) यांना हर्ष दुबे याने सलग चेंडूंवर बाद करुन केकेआर संघाची दाणादाण उडवून दिली. केकेआर संघाचे पाच फलंदाज केवळ ७० धावांत तंबुत परतले होते. त्यानंतर केकेआर संघाचा पराभव निश्चित झाला.  

अंगकृष रघुवंशी (१४), रमणदीप सिंग (१३) हे देखील स्वस्तात बाद झाले. हर्षित राणा (३४) याने थोडा प्रतिकार केला. केकेआर संघ १८.४ षटकात १६८ धावांवर सर्वबाद झाला. केकेआर संघाला तब्बल ११० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. जयदेव उनाडकट (३-२४), इशान मलिंगा (३-३१), हर्ष दुबे (३-३४) यांनी अचूक मारा करत प्रत्येकी तीन विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 

क्लासेनचे वादळी शतक 
हेनरिक क्लासेनचे स्फोटक शतक आणि ट्रॅव्हिस हेडचे दमदार अर्धशतक या कामगिरीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाने कोलकाता नाईट रायडर्ससमोर २७९ धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने २० षटकांत तीन गडी गमावून २७८ धावा केल्या. आक्रमक फलंदाज क्लासेनने १०५ धावांची सर्वाधिक नाबाद खेळी करुन सामन्याचे चित्र बदलून टाकले. त्याच वेळी, ट्रॅव्हिस हेड ४० चेंडूत ७६ धावा करून बाद झाला. केकेआरकडून सुनील नरेन याने दोन आणि वैभव अरोराने एक विकेट घेतली.

या सामन्यात अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या सलामी जोडीने सनरायझर्स हैदराबादला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये ९२ धावांची भागीदारी झाली. सुनील नरेनने अभिषेकला आपला बळी बनवले. तो १६ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांसह ३२ धावा काढून बाद झाला. त्यानंतर, नरेनने ट्रॅव्हिस हेड याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तो सहा चौकार आणि तितक्याच षटकारांसह ७६ धावा काढून बाद झाला. त्याने २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

या सामन्यात हेनरिक क्लासेन वेगळ्या रंगात दिसला. त्याने फक्त ३७ चेंडूत शानदार शतक पूर्ण केले आणि एक मोठी कामगिरी केली. तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा संयुक्त तिसरा फलंदाज ठरला. या बाबतीत त्याने २०१० मध्ये ३७ चेंडूत शतक झळकावणाऱ्या युसूफ पठाणची बरोबरी केली. या शानदार खेळीमुळे हैदराबाद संघाने आयपीएलच्या इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या रचली. यापूर्वी, संघाने राजस्थान संघाविरुद्धच्या साखळी टप्प्यातील पहिल्या सामन्यात सहा विकेट गमावून २८६ धावा केल्या होत्या. या सामन्यात इशान किशनने २९ धावा केल्या तर अनिकेत वर्मा १२ धावा करून नाबाद राहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *