
सौरव गांगुलीचा भाऊ स्नेहाशिष व अर्पिता बचावले
कोलकाता ः भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा भाऊ आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्नेहाशीष गांगुली आणि पत्नी अर्पिता थोडक्यात बचावले. पुरीच्या समुद्रात जलक्रीडा एन्जॉय करताना स्नेहाशिष आणि अर्पिताची स्पीडबोट उलटली, पण दोघांनाही वाचवण्यात आले आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली.
शनिवारी संध्याकाळी स्नेहाशिष आणि अर्पिता स्पीडबोटवरुन प्रवासाचा आनंद घेत असताना दीपगृहाजवळ ही घटना घडली. पीटीआय या वृत्तसंस्थेकडे उपलब्ध असलेल्या व्हिडिओ संदेशात अर्पिता म्हणाली, ‘देवाच्या कृपेने आपण वाचलो. मला अजूनही धक्का बसला आहे. असे होऊ नये आणि समुद्रात जलक्रीडा योग्यरित्या आयोजित केल्या पाहिजेत. कोलकात्याला परतल्यानंतर, मी पुरीचे पोलिस अधीक्षक आणि ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याविषयी सांगेन.
या घटनेबद्दल तिने सांगितले की, मोठ्या लाटेमुळे तिची बोट उलटली आणि ती आणि तिचा पती यांच्यासह सर्व प्रवासी समुद्रात पडले. तिने सांगितले की, ‘सुदैवाने, जीवरक्षकाच्या तत्पर कारवाईमुळे आमचे प्राण वाचले.’ या घटनेच्या स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ‘स्पीडबोट’ मोठ्या लाटेत आदळल्यानंतर समुद्रात उलटली.