देशांतर्गत क्रिकेटमध्ये १४ हजार प्लस धावा
अहमदाबाद ः गुजरातचा माजी कर्णधार प्रियांक पांचाळ याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. गुजरात क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) सोमवारी ही माहिती दिली.
जीसीएचे सचिव अनिल पटेल म्हणाले, गुजरात क्रिकेट असोसिएशन प्रियांक पांचाळ यांना त्यांच्या शानदार कारकिर्दीबद्दल अभिनंदन करते. या फलंदाजाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाल केली
इंडिया अ संघाचे नेतृत्व करणाऱ्या गुजरातच्या या फलंदाजाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये १४ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने १२७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४५.१८ च्या सरासरीने ८८५६ धावा केल्या. यामध्ये २९ शतके आणि ३४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, त्याच्या नावावर ९७ लिस्ट ए आणि ५९ टी-२० सामन्यांमध्ये अनुक्रमे ३६७२ आणि १५२२ धावा आहेत. याशिवाय, त्याने या तिन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे १६, ४ आणि ४ विकेट्स घेतल्या.
जीसीएचे सचिव अनिल पटेल पुढे म्हणाले की, उजव्या हाताचा फलंदाज प्रियांक पांचाळ याने इंडिया अ संघाचा कर्णधार म्हणून राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. तो सलामीवीर म्हणून उत्कृष्ट धावा करणारा फलंदाज होता आणि त्याने १७ वर्षांहून अधिक काळ स्थानिक सर्किटमध्ये गुजरात क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधित्व केले.
पांचाळचे वर्चस्व
२०१६-१७ च्या रणजी ट्रॉफी हंगामात पांचाळने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने ३१४ धावांची नाबाद खेळी करत एकूण १३१० धावा केल्या. त्याच्या दमदार खेळीमुळे त्यावेळी गुजरात विजेता ठरला. तो २०१५-१६ मध्ये विजय हजारे ट्रॉफी आणि २०१२-१३ आणि २०१३-१४ मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकणाऱ्या गुजरात संघाचा सदस्य होता.



