
मुंबई ः राष्ट्रीय छात्र सेनेच्या वायुसेना विभागातील फर्स्ट महाराष्ट्र एअर स्वाड्रन एनसीसी युनिटतर्फे बी के बिर्ला महाविद्यालय कल्याण येथे १० दिवसांचे वार्षिक प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातील एकूण ३६२ कॅडेट्सनी सहभाग घेतला होता.
सदर शिबिरात कॅडेट्रेना व्यक्तिमत्व विकास, रायफल नेमबाजी, परेड संचलन, आपदा व्यवस्थापन, अग्निशामक यंत्र हाताळणे, स्वसंरक्षण आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. या व्यतिरिक्त शिबिरात चित्रकला, निबंध लेखन, वैयक्तिक नृत्य स्पर्धा व १०० मीटर धावणे या वैयक्तिक तर डॉजबॉल, रस्सीखेच, परेड संचलन व सांस्कृतिक कार्यक्रम अशा सांघिक स्पर्धा घेण्यात आल्या. सोहम सासवडे याने चित्रकला स्पर्धेत, नेहल येलावे हिने निबंध लेखनात, स्वप्रीत शिंदे हिने वैयक्तिक नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.
शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत मुलींच्या गटात श्रावणी उबाळे हिने प्रथम तर मुलांच्या गटात वैभव गुप्ता याने द्वितीय क्रमांक मिळविला. सांघिक स्पर्धेत डॉजबॉल, ग्रुप डान्स, परेड संचलन या तीन बाबींमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. वैयक्तिक व सांघिक मिळून ८ पैकी ७ प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून न्यू होरायझन शाळेने सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. निमिषा खापरे व अनुकूल जाधव यांना शिबिरातील सर्वोत्कृष्ट कॅडेट म्हणून गौरविण्यात आले.
एनसीसी ऑफिसर संगम डंगर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अनन्या राऊत व निमिषा खापरे यांच्या नेतृत्वाखाली न्यू होरायझन शाळेच्या कॅडेट्सनी अतुलनीय कामगिरी करत मुंबई ठाण्यातील नावाजलेल्या शाळांना मागे टाकून हे यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, डायरेक्टर डॉ स्वाती शिराळकर, प्राचार्या डॉ अमिता दत्ता, उपप्राचार्या, पर्यवेक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.