
१५ वर्षांखालील खेळाडूंवर लक्ष्य केंद्रित करणार
मुंबई : देशात पायाभूत स्तरापासून उत्तम खेळाडू तयार करण्याचे लक्ष्य ड्रीम स्पोर्टस फाउंडेशन (डीएसएफ) यांनी युवा खेळाडूंच्या विकास कार्यक्रमातील महत्वाचा भागीदार म्हणून अल्टिमेट टेबल टेनिस (यूटीटी) यांना करारबद्ध केल्याचे जाहीर केले.
ड्रीम युटीटी ज्युनियर्स या १५ वर्षांखालील टेबल टेनिस स्पर्धेच्या माध्यमातून डीएसएफ यांनी या भागीदारीला प्रारंभ करण्याचे जाहीर केले. उदयोन्मुख टेबल टेनिसपटूंना व्यावसायिक स्तरावर अनुभव देण्यासाठी ही स्पर्धा महत्वाची ठरेल.
अहमदाबाद येथे २९ मे ते ८ जून दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या अल्टिमेट टेबल टेबल लीग बरोबरच पहिली ड्रीम युटीटी ज्युनियर्स स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे फॅन कोड या संकेतस्थळावर प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
या भागीदारीविषयी बोलताना ड्रीम स्पोर्टसचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक हर्ष जैन म्हणाले की, ड्रीम स्पोर्टस या संस्थेत मेक स्पोर्टस बेटर(क्रीडा क्षेत्र समृद्ध करूया)या आमच्या लक्ष्यासाठी आम्ही काम करत आहोत. अल्टिमेट टेबल टेबल (युटीटी) च्या माध्यमातून भारतातील गुणवान टेबल टेनिस पटूना मार्गदर्शन करून जागतिक स्तरावर चमकण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विटा दाणी व नीरज बजाज यांचे आभार मानले पाहिजेत. मात्र, त्याचवेळी पायाभूत स्तरावर आणखी प्रयत्न होण्याची गरज आहे व त्यासाठीच ड्रीम युटीटी ज्युनियर्स या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मोठी झेप घेतली आहे. ड्रीम स्पोर्टस फाउंडेशन च्या माध्यमातून भारताच्या कानाकोपऱ्यातील गुणवान खेळाडूंची पुढची पिढी घडवू. २०३० युथ ऑलिम्पिक आणि २०३६ उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला दैदिप्यमान यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात.
अल्टिमेट टेबल टेनिसच्या को-प्रमोटर विटा दाणी म्हणाल्या की, ड्रीम युटीटी ज्युनियर्स स्पर्धा ही ड्रीम स्पोर्टस फाउंडेशन व युटीटी यांच्या भागीदारीतून युवा खेळाडू घडविण्याच्या मोहिमेचे पुढचे पाऊल आहे. गुणवान टेबल टेनिस पटूना जागतिक दर्जाच्या सुविधा व अनुभव देऊन आम्ही त्यांना केवळ पदार्पणाची संधी देत नसून भारतीय खेळाडूंच्या पुढच्या पिढीला जागतिक स्तरावर चमकण्याची संधी देत आहोत.
ड्रीम युटीटी ज्युनियर्स स्पर्धेचा एक भाग म्हणून नुकत्याच पार पडलेल्या ड्रीम स्पोर्टस चॅम्पियनशिप या १५ वर्षांखालील स्पर्धेतील अव्वल आठ मुले व आठ मुली यांची आठ फ्रँचायझी मध्ये विभागणी करण्यात आली आहे. या खेळाडूना भारतातील सर्वोत्तम दर्जाच्या टेबल टेनिस लीगचा अनुभव मिळणार आहे.
नुकत्याच झालेल्या डीएसएफ टेनिस १५ वर्षांखालील स्पर्धेच्या यशामुळे भारतात सर्वोच्च दर्जाची व्यावसायिक स्पर्धा आयोजित कण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. तसेच युटीटी मुळे २०१७ पासूनच उच्च दर्जाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामुळं भारतातील टेबल टेनिस ची निश्चित वेगाने प्रगती सुरू झाली असून युवा खेळाडूंना एक व्यावसायिक उत्तम व्यासपीठ मिळाले आहे.