< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); एमसीए अकादमी ब केंद्र, कांदिवली केंद्र अंतिम फेरीत – Sport Splus

एमसीए अकादमी ब केंद्र, कांदिवली केंद्र अंतिम फेरीत

  • By admin
  • May 30, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा

मुंबई ः नारायण ठाकूर आणि शिव त्रिपाठी यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर एमसीए अकादमी ब केंद्राने घाटकोपर केंद्राचा फडशा पाडत ३३व्या एलआयसी एमसीए कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात युग असोपा आणि आरूष मिश्रा यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कांदिवली केंद्राने एमसीए अकादमी अ केंद्राचा पाडाव करत अंतिम फेरी गाठली.

राज्यात तसेच मुंबईत १२ दिवसांआधीच मान्सूनचे आगमन झाल्यामुळे त्याचा फटका १६ वर्षांखालील निवड चाचणीचा दर्जा लाभलेल्या या कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेला बसला. दोन दिवसांपूर्वी दमदार बरसलेल्या पावसामुळे मुंबईतील मैदाने ओलीचिंब झाली असल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि कल्पेश कोळी स्पर्धेच्या संयोजन समितीने दोन दिवसांऐवजी हे सामने फक्त ५० षटकांचे खेळवण्याचा निर्णय घेतला. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी असल्याने हे सामने डहाणू आणि पालघर येथे खेळवण्यात आले.  अंतिम फेरीचा सामना डहाणूच्या अदानी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

पालघरच्या एसटी कदम कॉलेजच्या मैदानावर रंगलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत, प्रथम फलंदाजी करणाऱ्या घाटकोपर केंद्राचा डाव अवघ्या १०९ धावांवर संपुष्टात आला. सामनावीराचा पुरस्कार पटकावणाऱ्या नारायण ठाकूर याने घाटकोपर केंद्राचा निम्मा संघ गारद केला तसेच शिव त्रिपाठीने चार फलंदाजांना माघारी पाठवत घाटकोपर केंद्राच्या डावाला खिंडार पाडले. ११० धावांचे आव्हान एमसीए अकादमी ब केंद्राने सहजपणे पार केले. कुशल पाटील (२९) आणि श्लोक माळी (नाबाद २१) यांनी उपयुक्त योगदान देत एमसीए अकादमी ब केंद्राचा विजय साकारला. घाटकोपर केंद्राच्या विवान जोबनपुत्र याने तीन विकेट्स मिळवले.

डहाणू येथे रंगलेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात, युग असोपा (७०), आरूष मिश्रा (६०) तसेच अगस्त्य उपाध्याय (३३) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर कांदिवली केंद्राने ५० षटकांत ६ बाद २२४ धावा उभारल्या. एमसीए अकादमी अ केंद्राच्या अर्जुन गोडे याने तीन बळी मिळवत प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. प्रत्युत्तरादाखल, एमसीए अकादमी अ केंद्राला ४९.२ षटकांत सर्वबाद १९३ धावाच करता आल्या. एमसीए अकादमी अ केंद्राच्या वेद तेंडुलकर (४५), कविश घोसालिया (३४), युग पाटील (४३) यांनी चांगला प्रतिकार केला असला तरी त्यांना विजयासाठी ३३ धावा कमी पडल्या. कांदिवली केंद्राच्या सिद्धांत जाधव याने तीन तर युग असोपा आणि रुद्र मेहता यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. सामन्यात अष्टपैलू खेळी साकारणारा युग असोपा सामनावीराचा मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक (उपांत्य फेरी)

१) घाटकोपर केंद्र : ३२.३ षटकांत सर्वबाद १०९ (शिवम सिंग २८, शिव त्रिपाठी ३१/४, नारायण ठाकूर १८/५) पराभूत विरुद्ध एमसीए अकादमी केंद्र २ : कुशल पाटील २९, स्लोक माली २१*, विवान जोबनपुत्रा २७/३). सामनावीर : नारायण ठाकूर

२) कांदिवली केंद्र : ५० षटकांत २२४/६ (अगस्त्य उपाध्याय ३३, आरुष मिश्रा ६०, युग असोपा ७०, अंश पटेल २१, अर्जुन गोडे ३८/३ विजयी वि/एस एमसीए अकादमी केंद्र १ : ४९.२ षटकांत सर्वबाद १९३ (वेद तेंडुलकर ४५, कविश घोसालिया ३४, युग पाटील ४३, सिद्धांत जाधव ४२/३, युग असोपा १९/२, रुद्र मेहता २३/२).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *