दमदार विजयासह मुंबई इंडियन्सची आगेकूच

  • By admin
  • May 30, 2025
  • 0
  • 8 Views
Spread the love

गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभव, साई सुदर्शनची ८० धावांची खेळी व्यर्थ 

चंदीगड : रोहित शर्मा (८१), हार्दिक पंड्या (२२) यांच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने एलिमिनिटर सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा २० धावांनी पराभव केला. साखळी फेरीत मुंबई संघाला दोनदा पराभूत करणाऱ्या गुजरातचे या पराभवाबरोबरच आयपीएल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. आता मुंबईचा सामना क्वालिफायर २ सामन्यात पंजाब किंग्ज संघाशी रविवारी होणार आहे. 

गुजरात टायटन्स संघासमोर विजयासाठी २२९ धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी शुभमन गिल आणि साई सुदर्शन ही जोडी मैदानात उतरली. बोल्ट याने पहिल्याच षटकात शुभमन गिलला (१) पायचीत बाद करुन मोठा धक्का दिला. त्यानंतर कुसल मेंडिस व सुदर्शन यांनी आक्रमक फलंदाजी करत ६४ धावांची भागीदारी केली. मेंडिस हिटविकेट बाद झाला. त्याने दोन षटकार व एक चौकार मारत २० धावा काढल्या. 

साई सुदर्शन याने दमदार अर्धसतक ठोकून सामन्यातील रंगत कायम ठेवली. वॉशिंग्टन सुंदर व सुदर्शन जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी करुन मुंबई संघाच्या तंबूत खळबळ उडवली. सुदर्शन याने ४९ चेंडूत ८१ धावांची जलद खेळी केली. त्याने आक्रमक अर्धशतक ठोकताना १० चौकार व १ षटकार मारला. १६व्या षटकात रिचर्ड ग्लीसन याने सुदर्शन याला क्लीन बोल्ड करुन सामन्यात मुंबईचे आव्हान कायम ठेवले. त्यानंतर रदरफोर्ड (२४), राहुल तेवतिया (नाबाद १६), शाहरूख खान (१३), रशीद खान (नाबाद ०) यांना रोखत मुंबईने २० धावांनी विजय साकारला. गुजरात संघ २० षटकात सहा बाद २०८ धावा काढू शकला. ट्रेंट बोल्ट (२-५६) याने दोन विकेट घेतल्या. बुमराह याने २७ धावांत सुंदरचा महत्त्वाचा बळी मिळवला. 

मुंबई इंडियन्सची बहारदार फलंदाजी 

रोहित शर्माच्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्ससमोर २२९ धावांचे लक्ष्य ठेवले. न्यू चंदीगड येथे खेळल्या जाणाऱ्या एलिमिनेटर सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने २० षटकांत पाच गडी गमावून २२८ धावा केल्या. रोहितने सर्वाधिक ८१ धावा केल्या. त्याच वेळी गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णा आणि साई किशोरने प्रत्येकी दोन गडी बाद केले तर मोहम्मद सिराजला एक यश मिळाले.

रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टोच्या सलामी जोडीने मुंबईला जलद सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी झाली. या सामन्यात पदार्पण करणाऱ्या बेअरस्टोला साई किशोरने बाद केले. तो २२ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४७ धावा काढल्यानंतर बाद झाला. त्यानंतर रोहित याला सूर्यकुमार यादवची सुरेख साथ मिळाली. दोघांनीही ३४ चेंडूत ५९ धावा जोडल्या. यादरम्यान सूर्यकुमारने २० चेंडूंचा सामना केला आणि ३३ धावा काढल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला.

या सामन्यात रोहित शर्माने २८ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. याशिवाय, त्याने आयपीएलमध्ये ३०० षटकारही पूर्ण केले. तो आयपीएलमध्ये ३०० षटकारांचा आकडा गाठणारा पहिला सक्रिय खेळाडू ठरला. आता त्याच्या नावावर ३०२ षटकार आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. रोहितने तिलक वर्मासोबत तिसऱ्या विकेटसाठी २२ चेंडूंमध्ये ४३ धावा जोडल्या. माजी कर्णधाराने ५० चेंडूंमध्ये नऊ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या. त्याच वेळी, तिलक ११ चेंडूंमध्ये २५ धावा आणि नमन धीर नऊ धावा काढून बाद झाला. हार्दिक पंड्या नऊ चेंडूंमध्ये तीन षटकारांच्या मदतीने २२ धावा करून नाबाद राहिला तर सँटनर खाते न उघडता नाबाद राहिला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *