
एमपीएलमुळे सर्वसामान्य कुटुंबातील गुणवान खेळाडूंना संधी – रोहित पवार
पुणे ः येत्या ४ जूनपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग या दोन स्पर्धांचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील एमपीएलचा ४ एस पुणेरी बाप्पा हा संघ तर डब्लूएमपीएलचा पुणे वॉरियर्सचा संघ सज्ज झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित दादा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव कमलेश पिसाळ, अपेक्स कौन्सिल सदस्य विनायक द्रविड, सुहास पटवर्धन, सुनील मुथा, कल्पना तापीकर, सुशील शेवाळे, सीईओ अजिंक्य जोशी, ४ एस पुणेरी बाप्पा संघाचे मालक आशिष देसाई, पुणे वॉरियर्स संघाचे मालक मनप्रित उप्पल, आयकॉन खेळाडू रामकृष्ण घोष व यश क्षीरसागर, सातारा वॉरियर्स संघाचे मालक गौरव गढोक, आयकॉन खेळाडू अनुजा पाटील, पुणे वॉरियर्सच्या उपकर्णधार श्वेता माने यांसह महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले की महाराष्ट्र प्रीमियर लीगमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक नवोदित खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळत आहे. या स्पर्धेमुळे त्यांच्यासाठी भविष्यातील अनेक दरवाजे उघडले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे (एमसीए) राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेटच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रत्येकी ७५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. जिल्हास्तरावर पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी, अनेक नवीन प्रतिभावान खेळाडू निर्माण करण्यासाठी एमसीए सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात क्रिकेट सुविधांचा विकास करून महाराष्ट्र क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी एमसीए सदैव कटिबद्ध आहे.

यावेळी रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेमुळे राज्याच्या कानाकोपर्यात असलेल्या गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी संधी मिळणार असून या स्पर्धेमुळे भविष्यात भारतालाही गुणवान क्रिकेटपटू मिळणार आहेत. सलग तिसर्या वर्षी खेळविल्या जाणार्या या स्पर्धेच्या यशात सर्व संघांच्या मालकांचा मोलाचा वाटा आहे. एमपीएल व डब्ल्यूएमपीएल हे केवळ स्पर्धात्मक मंच नसून, एक परिवार आहे. सर्व संघमालक, खेळाडू, पदाधिकारी, टेक्निकल टीम आणि सपोर्ट स्टाफ यांचे परिश्रम या यशामागे आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या साथीने पुणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आम्ही सक्रियपणे काम करत आहोत व भविष्यात आपल्याला सकारात्मक बदल झालेले दिसतील, हा आम्हाला विश्वास आहे. आज पुणे मधील अनेक महिला व पुरुष खेळाडू विविध वयोगटांसाठी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आमचा दृढ विश्वास आहे की येत्या काळात एमपीएल व डब्ल्यूएमपीएलच्या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडू महाराष्ट्राकडून व पुढे जाऊन देशासाठी खेळतील. पुण्याच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी सर्व पुणेकर क्रिकेट रसिकांनी स्टेडियमवर यावे व संघाला व एमपीएलच्या सर्व सोशल मीडियाला फॉलो करावे. तसेच एमपीएलच्या उद्घाटनाला तसेच सर्व सामन्यांचा आनंद घेण्यासाठी एमसीएच्या गहुंजे स्टेडियमवर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे..
या वर्षीच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग लिलावासाठी एकूण ४०९ पुरुष खेळाडू आणि २४९ महिला खेळाडू नोंदणीकृत होते. त्यामधून संघ मालकांनी आपल्या संघांचा बॅलन्स व गरजेनुसार संघासाठी खेळाडूंची निवड केली. या हंगामात एमपीएल मध्ये ६ संघ आणि डब्लूएमपीएल मध्ये ४ संघ सहभागी झाले असून, ही स्पर्धा येत्या ४ जून २०२५ मध्ये एमसीए गहुंजे इंटरनॅशनल स्टेडियम, पुणे येथे खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टार व स्टार स्पोर्ट्स २ या वाहिन्यांवर करण्यात येणार आहे, ज्यामुळे ही स्पर्धा राज्यासह संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटना आगामी हंगामात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या धर्तीवर स्वतःची अकादमी सुरु करणार असून ही अकादमी अजय शिर्के यांच्या नावाने पुण्यातच सुरु करण्यात येईल. त्यानंतर महाराष्ट्रात चार विभागीय अकादमी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी मदत होणार आहे.
सर्व सामान्यांसाठी मैदानात मोफत प्रवेश
इतर असोसिएशनच्या स्पर्धांमध्ये सामना पाहण्यासाठी तिकिट विकत घ्यावे लागते. पण एमसीएने मात्र सर्वसामान्य क्रिकेट रसिकांना सामन्यांना आनंद आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर घेता यावा, म्हणून दरवर्षीप्रमाणे मोफत प्रवेश ठेवला आहे. मुबलक जागेत मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. तसेच सामान्यांसाठी पिण्याच्या पाण्याची मोफत सोय असेल. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पीएमसी, पीसीएमसी व इतर खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना हे सामने दाखविण्यासाठी सोय केली जाणार आहे.
दिमाखदार उद्घाटन सोहळा
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित एमपीएल आणि डब्ल्युएमपीएल स्पर्धेचा उद्घाटन समारंभ बुधवार, ४ जून रोजी सायंकाळी होणार आहे. त्यामध्ये भव्य ड्रोन शो, सेलिब्रिटीजचे सादरीकरण व नंतर आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर फ्लड लाईटसमध्ये रत्नागिरी जेट्स आणि ईगल नाशिक टायटन्स यांच्यातील टी-२० सामना रंगणार आहे.
एमपीएल स्पर्धेतील सहभागी संघ
१. ४ एस पुणेरी बाप्पा
२. पीबीजी कोल्हापूर टस्कर्स
३. रत्नागिरी जेट्स
४. ईगल नाशिक टायटन्स
५. सातारा वॉरियर्स
६. रायगड रॉयल्स
डब्लूएमपीएल स्पर्धेतील सहभागी संघ
१. पुणे वॉरियर्स
२. रत्नागिरी जेट्स
३. सोलापूर स्मॅशर्स
४. रायगड रॉयल्स