
रोहन स्पोर्टतर्फे आयोजन, आदित्य भड मालिकावीर पुरस्काराचा मानकरी
येवला ः येवला तालुक्यातील रोहन स्पोर्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय क्रिकेट सिरीज ही अतिशय चुरशीची आणि उत्कंठावर्धक ठरली. या मालिकेत एसएनडी क्रिकेट अकॅडमी आणि वॉरियर्स इलेव्हन येवला या दोन संघांमध्ये एकूण पाच सामने खेळवण्यात आले. त्यामध्ये एसएनडी क्रिकेट अकॅडमी संघाने मालिका जिंकला.
या मालिकेतील मालिकावीर पुरस्कार आदित्य भड याने पटकावला. आदित्य याने या मालिकेत चमकदार फलंदाजी केली. त्याने एकूण २३७ धावा व १० बळी घेतले आणि आपल्या संघाला मालिका जिंकून दिली. या स्पर्धेत हिमांशु कोकणे (पहिला सामना), चैतन्य सपकाळ (दुसरा सामना), प्रशांत आहेर (तिसरा सामना), आदित्य भड (चौथा सामना) आणि आदित्य भड (अंतिम सामना) यांनी चमकदार फलंदाजी करत सामनावीर पुरस्कार संपादन केला.
या मालिकेतील विजेत्या संघाला प्रमुख पाहुणे रोहन स्पोर्टचे मालक संदीप खोडके, संदीप दाणेकर, दाभाडे व पगारे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. रोहन स्पोर्टच्या पुढाकारामुळे येवला तालुक्यातील लेदर बॉल क्रिकेटला नवे वळण लाभले आहे. ही स्पर्धा केवळ क्रिकेटची नव्हती, तर स्थानिक पातळीवरील खेळाडूंमध्ये आत्मविश्वास व स्पर्धात्मकता निर्माण करणारा एक खेळ महोत्सव होता.