नवी दिल्ली ः अर्जेंटिनातील रोझारियो येथे सुरू असलेल्या चार देशांच्या ज्युनियर महिला हॉकी स्पर्धेतील पाचव्या सामन्यात भारताने उरुग्वेवर शूटआउटमध्ये ३-१ असा विजय मिळवला. त्याआधी, निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत होता.
भारताकडून उपकर्णधार हीना (१० व्या मिनिटाला) आणि लालरिनपुई (२४ व्या मिनिटाला) यांनी सामन्याच्या निर्धारित वेळेत गोल केले तर गीता, कनिका आणि लालथंथलुगी यांनी शूटआउटमध्ये मिळालेल्या संधींचा फायदा घेत संघाचा विजय निश्चित केला.
आक्रमक सुरुवात करून भारताने सामन्यावर वर्चस्व गाजवले. हीनाने १० व्या मिनिटाला खाते उघडले तर लालरिनपुईच्या गोलने मध्यांतरापर्यंत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
तथापि, शेवटच्या क्वार्टरमध्ये उरुग्वे संघाने उत्तम पुनरागमन केले. संघाने तीन मिनिटांत दोन गोल करून गुणांची बरोबरी केली. इनेस डी पोसाडासने ५४ व्या मिनिटाला गोल केला तर मिलाग्रोस सेगलने ५७ व्या मिनिटाला गोल करत २-२ अशी बरोबरी साधली.
भारताने शूटआउटमध्ये संयम राखला आणि गीता, कनिका आणि लालथंथलुगी यांनी सलग तीन गोल केले तर उरुग्वेला फक्त एकच गोल करता आला. भारतीय संघ आता रविवारी (सोमवारी भारतीय वेळेनुसार) यजमान अर्जेंटिना संघाविरुद्ध खेळेल.