
लंडन ः ट्रॅफिक जाममुळे इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमधील सामना उशिरा सुरू झाला. सामना खेळण्यासाठी इंग्लंडचे खेळाडू सायकलवरून क्रिकेट स्टेडियमवर पोहोचले.
लंडनमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणारा तिसरा एकदिवसीय सामना पावसामुळे नाही तर ट्रॅफिक जाममुळे उशिरा सुरू झाला. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचे खेळाडूही लंडनमध्ये ट्रॅफिक जाममध्ये अडकले आणि वेळेवर स्टेडियमवर पोहोचू शकले नाहीत. विशेष म्हणजे इंग्लंडचे खेळाडू टीम बसमधून उतरले आणि सायकलने स्टेडियमवर पोहोचण्याचा निर्णय घेतला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
नाणेफेक उशीराने झाली
इंग्लंडचे खेळाडू सामन्यापूर्वी सरावासाठी वेळेवर पोहोचले, परंतु वेस्ट इंडिजचे खेळाडू बसमध्येच राहिले आणि टॉसच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचले. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप हसत म्हणाला, ‘आपण पायी यायला हवे होते.’ ब्रिटनच्या पीए वृत्तसंस्थेनुसार, वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचे हॉटेल ओव्हलपासून पाच किलोमीटर अंतरावर होते. टॉसला ४० मिनिटे उशिरा सुरुवात झाली. इंग्लंडने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.