
मंदार भंडारी, साहिल पारीख, अर्शिन कुलकर्णी विजयाचे शिल्पकार
अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत सलामीच्या लढतीत मंदार भंडारी (नाबाद ११२) याने झळकावलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने गतविजेत्या रत्नागिरी जेट्स संघाचा ८ गडी राखून पराभव करून शानदार सुरुवात केली. विशेष मंदार भंडारी याने एमपीएल स्पर्धेतील वैयक्तिक दुसरे शतक साजरे करण्याचा विक्रम नोंदवला. याआधी त्याने १४ जून २०२४ मध्ये एमपीएलच्या दुसऱ्या पर्वात शतकी खेळी केली होती.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर चार जूनपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रत्नागिरी जेट्स संघाने २० षटकात ६ बाद १९४ धावांचे आव्हान उभे केले. सामन्यात पहिल्याच षटकात नाशिकच्या मुकेश चौधरीने रत्नागिरीच्या प्रीतम पाटील (१२ धावा) याला झेलबाद करून संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर कर्णधार अझीम काझीने ३१ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह ४२ धावा केल्या. अझीम व धीरज फटांगरे या जोडीने ५५ चेंडूत ७५ धावा करून संघाचा डाव सावरला. सलामीवीर धीरज फटांगरेने ४७ चेंडूत ७ चौकार व ४ चौकारांसह नाबाद ८१ धावांची अफलातून खेळी करून एका बाजूने संघाची बाजू सांभाळली. धीरजला दिव्यांग हिंगणेकर २०, निखिल नाईक १४, प्रीतम पाटील १२, अभिषेक पवार नाबाद १० यांनी छोटी खेळी करून साथ दिली. नाशिककडून मुकेश चौधरी (३-४३), अक्षय वाईकर (१-२६), प्रशांत सोळंकी (१-३१) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
१९५ धावांचे आव्हान ईगल नाशिक टायटन्स संघाने १८.२ षटकात २ गडी बाद १९५ धावा काढून पूर्ण केले. सलामीची जोडी मंदार भंडारी व अर्शिन कुलकर्णी यांनी ७४ चेंडूत १२२ धावांची भागीदारी करून संघाला सुरेख सुरुवात करून दिली. अर्शिन कुलकर्णी २९ धावा काढून तंबूत परतला. कर्णधार अझीम काझीने त्याला झेलबाद केले. मंदार भंडारीने धडाकेबाज फलंदाजी करताना धावांची शतकी खेळी करून संघाच्या डावात मोलाचा वाटा उचलला. विजयासाठी नाशिक संघाला ४७ चेंडूत ७३ धावा असे समीकरण होते. मंदार भंडारीची तुफानी खेळी व साहिल पारीखची (४६ धावा) सुरेख साथ यामुळे हे आव्हान १० चेंडू राखून पूर्ण केले. साहिल पारीखने २२ चेंडूत ४६ धावा करताना ५ चौकार व ३ षटकार ठोकले.
ड्रोन शो, लाईट शोमुळे क्रिकेटप्रेमी मंत्रमुग्ध
एमपीएल स्पर्धेतील सलामीच्या रत्नागिरी जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स लढतीतील पहिला डाव संपल्यानंतर भव्य अशा ड्रोन आणि लाईट शोचे आयोजन करण्यात आले होते. मैदानाच्या भव्य आकाशाच्या विस्तीर्ण कॅनव्हासवर भारतीय सैन्यदल, हवाई दल, नौदल, भारतीय ध्वज, एमपीएल व डब्लूएमपीएल करंडक यांच्या जिवंत झालेल्या प्रतिकृतींचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला. तब्बल ६०६ ड्रोन्सचा वापर करून आकर्षक दृश्य सादर करण्यात आली. या ड्रोन शो च्या माध्यमातून भारतीय संरक्षण दलाला मानवंदना देण्यात आली. हा नेत्रदीपक सोहळा मैदानावर प्रचंड संख्येने उपस्थितअसलेल्या क्रिकेटप्रेमींनी आपल्या मोबाईल कॅमेरात टिपला. असा ड्रोन शो २०२३ विश्वचषकाच्या अंतिम लढतीनंतर आणि आयपीएल स्पर्धेच्या उद्घटनावेळी पार पडला होता.
संक्षिप्त धावफलक
रत्नागिरी जेट्स : २० षटकात ६ बाद १९४ धावा (धीरज फटांगरे नाबाद ८१, अझीम काझी ४२, दिव्यांग हिंगणेकर २०, निखिल नाईक १४, प्रीतम पाटील १२, अभिषेक पवार नाबाद १०, मुकेश चौधरी ३-४३, अक्षय वाईकर १-२६, प्रशांत सोळंकी १-३१) विजयी विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स : १८.२ षटकात २ बाद १९५ धावा (मंदार भंडारी नाबाद ११२, साहिल पारीख ४६, अर्शिन कुलकर्णी २९, अझीम काझी १-२१, दिव्यांग हिंगणेकर १-५६). सामनावीर मंदार भंडारी.