अमरावती येथे शनिवारपासून राष्ट्रीय बेसबॉल फेडरेशन कप 

  • By admin
  • June 6, 2025
  • 0
  • 4 Views
Spread the love

अमरावती ः महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन आणि अमरावती जिल्हा बेसबॉल असोसिएशन यांच्या यजमानपदाखाली १२ वी राष्ट्रीय बेसबॉल फेडरेशन कप स्पर्धेचे आयोजन ७ ते १० जून या कालावधीत अमरावती येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून ४०० हून अधिक राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक अमरावतीत येत आहेत.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मैदानात होणाऱ्या १२व्या राष्ट्रीय स्पर्धेत ३७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धा, संगरूर, पंजाब येथे उपांत्य फेरीत आलेले ८ टॉप संघ त्यामध्ये यजमान महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, दिल्ली, केरळ, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड हे पुरुषांचे , तर पंजाब, दिल्ली, यजमान महाराष्ट्र, केरळ, हरियाणा, हिमाचल प्रदेश, चंदीगड, ओडिशा हे महिलांचे संघ सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेनिमित्त संपूर्ण भारतातून सुमारे ४०० हून अधिक राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक, पंच अमरावतीत येत आहेत. या स्पर्धेसाठी यजमान अमरावती शहरात महाराष्ट्र संघाचे सराव शिबीर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मैदानावर सुरू झाले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रसंगी माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, अॅम्युचुअर बेसबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष  डी डी गर्ग, महासचिव अरविंद कुमार व खजिनदार एस व्यंकटेश यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण १० जून रोजी दुपारी ४ वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ अविनाश असनारे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ तनुजा राऊत, महाराष्ट्र बेसबॉल संधटनेचे सचिव राजेंद्र इखनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार असून महाराष्ट्राच्या संघामध्ये यावर्षीचे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू प्रदीप पाटील, रेखा धनगर यांच्यासह महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय खेळाडू नंदन परब, ऋषीकेश राऊळ, संतोष कचरे, ज्योती पवार, आरती भगत, विद्या गिरी, रिया आगवणे, रितु फ्रांसिस या खेळाडूंचा समावेश आहे.

या स्पर्धेकरीता महाराष्ट्र बेसबॉल संघटनेचे सचिव व अखिल भारतीय बेसबॉल फेडरेशनचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष राजेंद्र इखणकर, स्पर्धेचे आयोजक सचिव व महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष इंद्रजित नितनवार, खजिनदार दिपेन वाळके सहसचिव, मकरंद कोऱ्हाळकर, तांत्रिक समिती प्रमुख अशोक सरोदे, महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक संतोष खेंडे, पंचप्रमुख चरणजित सिंग, आयोजक अमरावती जिल्हा बेसबॉल संघटनेचे डॉ सुनीलकुमार, शरद गढीकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व खेळाडू प्रयत्न करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *