एमजीएम विद्यापीठ क्रिकेट संघाला विजेतेपद

  • By admin
  • June 6, 2025
  • 0
  • 37 Views
Spread the love

मनपा आयोजित अधिकारी कर्मचारी टी २० क्रिकेट स्पर्धेचा शानदार समारोप

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित अधिकारी कर्मचारी टी २० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एमजीएम विद्यापीठ क्रिकेट संघाने शहर पोलिस क्रिकेट ब संघावर मात करून अजिंक्यपद पटकावले.

आयुक्त आणि प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून अधिकारी-कर्मचारी यांना आपल्या कामातून तणावमुक्त होण्यासाठी व सुट्टीच्या दिवशी व रात्रीच्या वेळेस निवांत प्रकाशझोतात सामने खेळण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण १५ संघांनी सहभाग घेतला होता.

अंतिम सामन्यात एमजीएम संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या फायद्यासाठी ठरला. शहर पोलिस क्रिकेट संघाने १६.४ षटकात सर्वबाद १०५ धावा केल्या. शहर पोलिस ब संघातर्फे राहुल राजपूत ३२ धावा, जीवन बावस्कर १५ धावा, तर असिफ शेख यांनी १३ धावा केल्या. एमजीएम संघाकडून उत्कृष्ट गोलंदाजी करताना मयूर राजपूत आणि लक्ष्मण सूर्यवंशी यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. एमजीएम विद्यापीठ क्रिकेट संघाने १०५ धावांचे लक्ष १३ षटकात पूर्ण करून नऊ गडी राखून विजेतेपद पटकाविले.

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी क्रिकेटपटू इक्बाल सिद्दिकी, माजी रणजीपटू अनंत नेरळकर, संदीप नागरे व दिनेश कुंटे यांच्या हस्ते पार पडले. बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी माजी कसोटीपटू इक्बाल सिद्दीकी यांनी सांगितले की आयुक्तांमुळे हे दिवस रात्रीचे सामने होत आहेत आणि त्याचा फायदा शहरातील सर्व खेळाडूंनी घ्यायला पाहिजे. विशेष करून त्यांनी वयोगट १४ ते १९ वर्षांखालील वयोगटातील मुलांसाठी सुद्धा अशा स्पर्धेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे करण्यात यावे असे सांगितले. त्याचा फायदा खेळाडूंना होऊ शकतो. यावेळी अनंत नेरळकर, संदीप नागरे व दिनेश कुंटे यांनी मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत स्मृतिचिन्ह देऊन मनपाचे क्रीडा अधिकारी संजीव बालय्या यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा सचिव सय्यद जमशेद यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फेरोज खान पठाण यांनी केले. सुंदर खरात यांनी आभार मानले.

स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू

फलंदाज ः पांडुरंग वाघमोडे, शहर पोलिस क्रिकेट संघ ब
गोलदाज ः अमोल उदावंत, मनपा क्रिकेट संघ
मालिकावीर ः डॉ. राहुल राजपूत, एमजीएम विद्यापीठ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *