
अंकित बावणे, दिव्यांग हिंगणेकर, आत्मन पोरे, सचिन धसची चमकदार कामगिरी
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत चौथ्या दिवशी आत्मन पोरे (३-२९) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीसह अंकित बावणे (५१ धावा), सचिन धस (३५ धावा), सिद्धार्थ म्हात्रे (नाबाद ३५), राहुल त्रिपाठी (३२ धावा) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा ७ गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. १७३ धावांचे आव्हान कोल्हापूर टस्कर्स संघाने १८.४ षटकात ३ बाद १७४ धावा काढून पूर्ण केले.

आयपीएल स्टार खेळाडू राहुल त्रिपाठी व अंकित बावणे यांनी ३१ चेंडूत ५३ धावांची अर्धशतकी भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यात राहुल त्रिपाठीने १८ चेंडूत ३२ धावांची जोरदार खेळी केली. त्यात त्याने ४ चौकार व १ षटकार मारला. राहुलला सत्यजित बच्छाव याने झेलबाद केले. त्यानंतर अंकितने ४६ चेंडूत ५१ धावा करून आपले अर्धशतक साजरे केले. त्यात ४ चौकार व १ षटकार खेचले.
अंकितने सचिन धसच्या समवेत दुसऱ्या विकेटसाठी ५५ चेंडूत ६९ धावांची भागीदारी केली. सचिन धस ३२ चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने ३५ धावा करून बाद झाला. त्यापाठोपाठ दिव्यांग याने अंकित बावणे याला झेलबाद करून त्याचा अडसर दूर केला. कोल्हापूर संघाला यावेळी विजयासाठी १८ चेंडूत ३२ धावांची आवश्यकता होती. सिद्धार्थ म्हात्रेने १४ चेंडूत ३५ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. सिद्धार्थने २ षटकार ३ षटकार ठोकले. धनराज शिंदे २ धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी, रत्नागिरी जेट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १७३ धावसंख्या उभारली. त्यात दिव्यांग हिंगणेकरच्या आक्रमक अर्धशतकाच्या मोलाचा वाटा राहिला. पॉवरप्लेमध्ये धीरज फटांगरे (२), अभिषेक पवार (१), प्रीतम पाटील (१) हे भरवशाचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. कोल्हापूरच्या आत्मन पोरे याने धीरज फटांगरेला पायचीत बाद केले. तर, एमपीएलमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या कोल्हापूरच्या रजनीश गुरबानीने प्रीतम पाटीलला बाद करून संघाला दुसरा धक्का दिला. त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आत्मनने अभिषेक पवार याला त्रिफळा बाद करून रत्नागिरीची चिंता आणखी वाढवली. रत्नागिरी संघ अडचणीत असताना पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या दिव्यांग हिंगणेकरने २६ चेंडूत ५८ धावांची झंझावाती खेळी करत सामन्यातील रोमांच वाढवला. विशेष म्हणजे दिव्यांगने कोल्हापूरच्या अथर्व डाकरेच्या ११ व्या षटकात सलग पाच टोलेजंग षटकार खेचून एमपीएलमध्ये नव्या विक्रमाची नोंद केली. याआधी ईगल नाशिक टायटन्सच्या धनराज शिंदेने रत्नागिरीच्या दिव्यांग हिंगणेविरुद्ध ९ जून २०२४ रोजी एकाच षटकात पाच षटकार मारले होते.
दिव्यांग व अझीम काझी या जोडीने चौथ्या विकेटसाठी ५० चेंडूत ९१ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. ही भागीदारी डोकेदुखी बनत असताना पुढच्याच षटकात आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात दिव्यांग हिंगणेकरचा श्रेयस चव्हाणने बळी घेतला. त्यानंतर कर्णधार अझीम काझीने ३८ चेंडूत ४७ धावा काढून संघाचा धावफलक हलता ठेवला. त्यात त्याने ३ चौकार व ३ षटकार खेचले. त्याचे अर्धशतक तीन धावांनी हुकले. श्रेयस चव्हाण याने अझीमला झेलबाद केले. निखिल नाईकने २८ चेंडूत ५ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ४० धावा काढून संघाला १७३ धावांचे आव्हान उभे करून दिले.
संक्षिप्त धावफलक
रत्नागिरी जेट्स : २० षटकात ७ बाद १७३ धावा (दिव्यांग हिंगणेकर ५८, अझीम काझी ४७, निखिल नाईक ४०, आत्मन पोरे ३-२९, श्रेयस चव्हाण २-३०, रजनीश गुरबानी १-१९) पराभूत विरुद्ध पीबीजी कोल्हापूर टस्कर्स : १८.४ षटकात ३ बाद १७४ धावा (अंकित बावणे ५१, सचिन धस ३५, सिद्धार्थ म्हात्रे नाबाद ३५, राहुल त्रिपाठी ३२, दिव्यांग हिंगणेकर २-४१). सामनावीर – आत्मन पोरे.