
नंदुरबार ः महाराष्ट्र आर्चरी संघटनेच्या वतीने ६ ते १३ जून दरम्यान गिरीजन महाविद्यालय चिखलदरा येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आर्चरी प्रशिक्षण शिबिरात नंदुरबार जिल्ह्यातील प्रशिक्षक व खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.
या शिबिरात प्रशिक्षक राजेश्वर ईश्वर चौधरी, तसेच निलेश भालचंद्र गावित, सुभाष जगन्नाथ नागरे व विराज सुभाष नागरे यांनी नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. हे सर्वजण नंदुरबार जिल्ह्यात आर्चरी या पारंपरिक आणि कौशल्याधारित खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत.
राज्यस्तरीय या प्रशिक्षण शिबिरात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रवीण सावंत, अमोल बोरिवले व चंद्रकांत इलग यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या उल्लेखनीय सहभागाबद्दल राज्य संघटनेचे सचिव डॉ प्रमोद चांदूरकर, तसेच नंदुरबार जिल्हा आर्चरी संघटनेच्या वतीने नूतनवर्षा वळवी, मीनल वळवी, डॉ मयुर ठाकरे व जितेंद्र पगारे यांनी सर्व सहभागी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील युवकांना धनुर्विद्या खेळाकडे आकर्षित करून नवसंजीवनी देण्यासाठी अशा शिबिरांचे मोठे योगदान आहे.