
अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धा – श्वेता माने सामनावीर
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत समृद्धी डाळे आणि श्वेता माने यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पुणे वॉरियर्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा ४ गडी राखून पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. या विजयाबरोबरच पुणे वॉरियर्स संघाने सलग चौथ्या विजयाची नोंद केली.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पुणे वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या पुणे वॉरियर्स संघाने रायगड रॉयल्सवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. रायगड रॉयल्स संघाने पहिल्यांदा खेळताना २० षटकात ९ बाद ११६ धावा केल्या.
सलामीवीर भाविका आहिरेने २७ चेंडूत ५ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ३३ धावा, तर श्रावणी देसाईने ३१ चेंडूत २ षटकारांसह २७ धावा केल्या. या सलामीच्या जोडीने ४२ चेंडूत ४२ धावांची भागीदारी केली. या दोघेही बाद झाल्यावर कर्णधार किरण नवगिरे २१ धावा काढून तंबूत परतली. त्यानंतर रायगड रॉयल्सची विकेटची गळती सुरूच राहिली. एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही. पुणे वॉरियर्सकडून समृद्धी डाळे (२-१८), अक्षया जाधव (२-२३) यांनी प्रत्येकी दोन गडी, तर चिन्मयी बोरफळे (१-१५) हिने एक गडी बाद केला.
११६ धावांचे आव्हान पुणे वॉरियर्स संघाने १९.४ षटकात ६ बाद ११७ धावा करून पूर्ण केले. वरच्या फळीतील फलंदाज सुहानी कहांडळ (८), खुशी मुल्ला (३), अक्षया जाधव (१), श्वेता सावंत (१०), वैष्णवी शिंदे (५) हे झटपट बाद झाल्यामुळे निम्मा संघ तंबूत परतला. पुणे संघ ८.४ षटकात ५ बाद ३२ अशा स्थितीत असताना कर्णधार अनुजा पाटीलने २६ चेंडूत २ चौकारांसह २८ धावांची संयमी खेळी केली.
अनुजा व श्वेता माने ४१ चेंडूत ५३ धावांची भागीदारी करून संघाची धावगती वाढवली. ही भागीदारी रंगत असताना अनुजा पाटील धावबाद झाली. प्रज्ञा वीरकर हिने दिलेल्या थ्रोवर रोशनी पारधीने चोरटी धाव घेत असताना तिला धावबाद केले. श्वेता मानेने ३२ चेंडूत २ चौकारांसह नाबाद ३७ धावांची खेळी करून संघाचा विजय सुकर केला. श्वेता माने व समृद्धी डाळे (नाबाद १०) यांनी सातव्या विकेटसाठी २६ चेंडूत ३२ धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
रायगड रॉयल्स : २० षटकात ९ बाद ११६ धावा (भाविका आहिरे ३३, श्रावणी देसाई २७, किरण नवगिरे २१, समृद्धी डाळे २-१८, अक्षया जाधव २-२३, चिन्मयी बोरफळे १-१५) पराभूत विरुद्ध पुणे वॉरियर्स : १९.४ षटकात ६ बाद ११७ धावा (अनुजा पाटील २८, श्वेता माने नाबाद ३७, किरण नवगिरे २-१६, यशोदा घोगरे २-१६, प्रज्ञा वीरकर १-३३). सामनावीर – श्वेता माने.