
गादिया स्मृती बॅडमिंटन स्पर्धेतील विजेत्यांना शिरीष बोराळकर यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे आयोजित प्रा के डी गादिया स्मृती जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत उदयन देशमुख याने चमकदार कामगिरी नोंदवत तिहेरी मुकुट पटकावला. राघव धुमक याने दुहेरी मुकुट संपादन केला.
जिल्हा बॅडमिंटन संघटना आयोजित व मंगलम ग्रुपचे अध्यक्ष शिरीष गादिया प्रायोजित योनेक्स सनराईज – प्रा के डी गादिया स्मृती बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उदयन देशमुख याने मुलांच्या १७ वर्षांखालील गटात आदित येणगेरेड्डी याला २१-११, २१-१५ असे हरवले आणि जेतेपद पटकावले. तसेच मुलांच्या १५ वर्षांखालील गटात आदित येणगेरेड्डी याच्यावर २२-२०, २१-११ असा विजय संपादन केला आणि मुलांच्या १७ वर्षांखालील दुहेरी गटात ओंकार निकम सोबत आयुष तुपे व विहान आनंद यांच्यावर २१-०८, २१-११ असा सहज विजय मिळवत तिहेरी मुकुटाचा मान मिळविला.
राघव धुमक याने मुलांच्या १९ वर्षांखालील गटात आदित येणगेरेड्डी याला २१-१३, २१-१२ असे हरवले तर पुरुष एकेरीत अर्णव रश्मि शिरीष याला ११-२१, २१-१६, २१-९ असा पराभव करुन दुहेरी मुकुट प्राप्त केला.
पारितोषिक वितरण सोहळा
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये झाला. महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे डेप्युटी प्रेसिडेंट आणि जिल्हा संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी सानप ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती अमित सानप तसेच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त ऋतुपर्ण कुलकर्णी व कृपा तेलंग आणि महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे सहसचिव आणि जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे सचिव सिद्धार्थ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत विविध गटात ३०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल कुलकर्णी यांनी केले. कृपा तेलंग यांनी सूत्रसंचालन केले. हिमांशु गोडबोले यांनी आभार मानले. या स्पर्धेत पंच म्हणून अतुल कुलकर्णी व परीक्षित पाटील यांनी काम पाहिले.
या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी संघटनेचे सचिव सिद्धार्थ पाटील, उपाध्यक्ष विरेन पाटील, कोषाध्यक्ष नितीन इंगोले, मिलिंद देशमुख, प्रभाकर रापतवार, शुभांगी जोशी, सचिन कुलकर्णी, सरफराज खान, चिरायू चौधरी, जावेद पठाण, सदाशिव पाटील, विजय जाधव, सत्यबोध टाकसाळी, विजय भंडारे, निकेत वराडे, निनाद कुलकर्णी, अर्णव बोरीकर, सदानंद महाजन आदींनी प्रयत्न केले.