
नाशिक ः पानिपत येथे झालेल्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाने चमकदार कामगिरी नोंदवत उपविजेतेपद संपादन केले.
टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहावी राष्ट्रीय सीनियर टेनिस क्रिकेट स्पर्धा पानिपत क्रीडा संकुल येथे उत्साहात संपन्न झाली. यामध्ये हरियाणा संघाने विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद संपादन केले. मध्य प्रदेश संघाने तिसरा तर मुंबई संघाने चौथा क्रमांक संपादन केला. या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैया गुजर, राष्ट्रीय महासचिव मीनाक्षी गिरी, हरियाणा सचिव कश्मीर सिंग, टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया उपाध्यक्ष पंकज सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणारे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेसाठी दोन संघ तयार करण्यात येणार आहे. हे दोन्ही संघ पोलंड आणि रशियामध्ये सहभागी होतील. तसेच ड्रीम लीग ऑफ इंडिया या लीग मध्ये खेळाडूंना संधी मिळणार आहे अशी माहिती आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष कन्हैया गुजर यांनी दिली.
तसेच भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे महासचिव मीनाक्षी गिरी यांनी विद्यार्थ्यांना टेनिस क्रिकेट खेळाबद्दल माहिती व त्याचे महत्त्व सांगितले. या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून मुलांचे १२ संघ सहभागी झाले होते.
टेनिस क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना हरियाणा विरुद्ध महाराष्ट्र असा झाला. त्यामध्ये हरियाणाच्या खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे नेत्रदीपक कामगिरी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. महाराष्ट्र संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या सचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे उपाध्यक्ष विलास गिरी, संदीप पाटील, सिद्धेश गुरव, महेंद्र देशमुख, महाराष्ट्र महिला अध्यक्ष धनश्री गिरी ,नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी संघाचे अभिनंदन केले व आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.