
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत ईश्वरी सावकार (७८धावा), ईश्वरी अवसरे (५२ धावा) यांनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर सोलापूर स्मॅशर्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा ३० धावांनी पराभव केला. सोलापूर स्मॅशर्स संघाने गुणतालिकेत ४ विजय, १ पराभवासह दुसरे स्थान कायम राखत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत रायगड रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सोलापूर स्मॅशर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २ बाद १६९ धावांचे आव्हान उभे केले. ईश्वरी सावकार व ईश्वरी अवसरे यांनी ७६ चेंडूत ९६ धावांची सलामी देत संघाला भक्कम सुरुवात करून दिली.
ईश्वरी सावकारने ५३ चेंडूत ७८ धावांची विक्रमी खेळी केली. याआधी ईश्वरी सावकाराने रत्नागिरी जेट्स विरुद्ध ७५ धावांची खेळी केली होती. तिला ईश्वरी अवसरेने ४४ चेंडूत ५२ धावांची आक्रमक खेळी करून साथ दिली. तिने ६ चौकार व २ उत्तुंग षटकार खेचले. ईश्वरी अवसरेला १३व्या षटकात आदिती गायकवाडने पायचीत बाद केले. त्यानंतर ईश्वरी सावकारने शाल्मली क्षत्रिय (नाबाद ३२) हिच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी ४३ चेंडूत ७० धावांची भागीदारी करून संघाला १६९ धावांचे आव्हान उभारुन दिले. रायगड रॉयल्सकडून प्रज्ञा वीरकर १-२३, आदिती गायकवाड १-२७) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. विशेष म्हणजे या स्पर्धेत रायगडच्या जान्हवी वीरकरने दुसरे षटक निर्धाव टाकले.
या आव्हानाचा पाठलाग करताना रायगड रॉयल्स संघाला २० षटकात ९ बाद १३९ धावापर्यंत मजल मारता आली. पॉवरप्लेमध्ये किरण नवगिरे (१८), भाविका आहिरे (१०), श्रावणी देसाई (२) हे बाद झाल्याने रायगड रॉयल्स ३ बाद ४३ धावा अशा स्थितीत होता. त्यानंतर आयेशा शेखने एकाबाजूने लढताना २५ चेंडूत २ चौकार व ३ षटकारांसह ४१ धावांची खेळी केली. तिला प्रज्ञा वीरकरने १६ धावा काढून साथ दिली. या जोडीने २६चेंडूत ३८ धावांची भागीदारी केली. सोलापूरच्या मुक्ता मगरेने आयेशा शेख हिला झेलबाद करून रायगड रॉयल्स अडचणीत टाकले. यशोदा घोगरे (१४), इशा पठारे (१३) हिने थोडासा प्रतिकार केला. सोलापूर स्मॅशर्सकडून शरयू कुलकर्णी (२-२१), मुक्ता मगरे (१-६), गायत्री सुरवसे (१-१९), शाल्मली क्षत्रिय (१-१९) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
संक्षिप्त धावफलक
सोलापूर स्मॅशर्स : २० षटकात २ बाद १६९ धावा (ईश्वरी सावकार ७८, ईश्वरी अवसरे ५२, शाल्मली क्षत्रिय नाबाद ३२, प्रज्ञा वीरकर १-२३, आदिती गायकवाड १-२७) विजयी विरुद्ध रायगड रॉयल्स : २० षटकात ९ बाद १३९ धावा (आयेशा शेख ४१, किरण नवगिरे १८, प्रज्ञा वीरकर १६, यशोदा घोगरे १४, इशा पठारे १३, भाविका आहिरे १०, शरयू कुलकर्णी २-२१, मुक्ता मगरे १-६, गायत्री सुरवसे १-१९, शाल्मली क्षत्रिय १-१९). सामनावीर – ईश्वरी सावकार.