
सामनावीर विकी ओस्तवालची अचूक गोलंदाजी
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत १२व्या लढतीत फिरकीपटू विकी ओस्तवालच्या (४-१७) अचूक गोलंदाजीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने ४ एस पुणेरी बाप्पा संघाचा २ गडी राखून पराभव करत तिसऱ्या विजयाची नोंद केली.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत रायगड रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ४ एस पुणेरी बाप्पा संघाने पहिल्यांदा खेळताना २० षटकात ९ बाद १४१ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये पुणेरी बाप्पा संघाने २ बाद ५६ धावा केल्या. यश नाहर २४ धावा तर, मुर्तुझा ट्रंकवाला २९ धावा काढून बाद झाला. एकाबाजूने विकेट पडत असताना पुणेरी बाप्पाच्या यश क्षीरसागरने ३५ चेंडूत नाबाद ४२ धावांची खेळी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. साहिल औताडे (१२), अद्वैय शिधे (११) हे मधल्या फळीतील फलंदाज फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात बाद झाले. रायगड रॉयल्सकडून फिरकीपटू विकी ओस्तवालने १७ धावात ४ महत्वपूर्ण बळी घेतले. तर, तनय संघवीने १७ धावात २ गडी, हितेश वाळुंज (१-२९), निखिल कदम (१-३१) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
रायगड रॉयल्स संघाला विजयासाठी निर्धारित षटकात १४२ धावांचे आव्हान होते. हर्ष संघवी ११ धावा काढून तंबूत परतला. सिद्धेश वीर व नीरज जोशी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३१ चेंडूत ३४ धावांची भागीदारी करून संघाचा धावफलक हलता ठेवला. पण पुणेरी बाप्पाच्या यश क्षीरसागरने नीरज जोशी (२३), ओंकार खाटपे (२) यांना एकापाठोपाठ बाद करून रायगड रॉयल्सला अडचणीत टाकले. पुणेरी बाप्पाच्या सोहन जमालेने दिग्विजय पाटील (९) याला तर, सचिन भोसलेने ऋषभ राठोड (७) याला बाद करून रायगडचा निम्मा संघ तंबूत परत पाठवला. तनय संघवीने १२ चेंडूत १ चौकार व २ षटकारांसह नाबाद २० धावा काढून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. विजयासाठी १२ चेंडूत १६ धावांची आवश्यकता असताना नवव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या सागर जाधवने नादब १८ धावांची अफलातून खेळी केली. त्याने एकाच षटकात तीन षटकार खेचून संघाला १८.५ षटकात ८बाद १४६ धावा करत विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
४ एस पुणेरी बाप्पा : २० षटकात ९ बाद १४१ धावा (यश क्षीरसागर नाबाद ४२, मुर्तुझा ट्रंकवाला २९, यश नाहर २४, साहिल औताडे १२, अद्वैय शिधे ११, विकी ओस्तवाल ४-१७, तनय संघवी २-१७, हितेश वाळुंज १-२९, निखिल कदम १-३१) पराभूत विरुद्ध रायगड रॉयल्स : १८.५ षटकात ८ बाद १४६ धावा (सिद्धेश वीर ४७, नीरज जोशी २३, तनय संघवी नाबाद २०, सागर जाधव नाबाद १८, यश क्षीरसागर २-१५, रामकृष्ण घोष २-२८, सचिन भोसले २-४४, सोहन जमाले १-६). सामनावीर – विकी ओस्तवाल.