
लंडन ः विम्बल्डनच्या यजमान ऑल इंग्लंड क्लबच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या ग्रँड स्लॅम स्पर्धेची बक्षीस रक्कम विक्रमी ५३.५ दशलक्ष पौंड (सुमारे ६.२३ अब्ज रुपये) पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यापैकी एकेरी श्रेणीतील विजेत्यांना तीस दशलक्ष पौंड (सुमारे ३४.९३ कोटी रुपये) मिळतील. ही रक्कम गेल्या वर्षीपेक्षा सात टक्के आणि ३.५ दशलक्ष पौंड जास्त आहे.
१० वर्षांपूर्वी या ग्रास-कोर्ट ग्रँड स्लॅममध्ये स्पर्धकांना मिळालेल्या रकमेच्या दुप्पट आहे. ऑल इंग्लंड क्लबच्या अध्यक्षा डेबोरा जेव्हन्स म्हणाल्या, गेल्या १० वर्षांत आम्ही बक्षीस रकमेत खूप वाढ केली आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे. गेल्या स्पर्धेच्या तुलनेत आम्ही या वर्षी सुमारे सात टक्के वाढ केली आहे. या वर्षीच्या पुरुष आणि महिला श्रेणीतील विजेत्यांना गेल्या वर्षीच्या बक्षिसांपेक्षा ११.१ टक्के जास्त रक्कम मिळेल. एकेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत होणाऱ्या खेळाडूंना ६६,००० पौंड (सुमारे ७६ लाख रुपये) मिळतील, जे गेल्या वर्षीपेक्षा १० टक्के जास्त आहे. वर्षातील तिसरा ग्रँड स्लॅम, विम्बल्डन, ३० जून रोजी सुरू होईल आणि तो १३ जुलै रोजी संपेल.