< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); सातारा वॉरियर्सचा रत्नागिरी जेट्सवर विजय   – Sport Splus

सातारा वॉरियर्सचा रत्नागिरी जेट्सवर विजय  

  • By admin
  • June 16, 2025
  • 0
  • 43 Views
Spread the love

राजवर्धन हंगरगेकरची भेदक गोलंदाजी 

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत आयपीएल स्टार खेळाडू राजवर्धन हंगरगेकर (३-१४) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर सातारा वॉरियर्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा डकवर्थ लुईस नुसार १४ धावांनी विजय मिळवला.  

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सातारा वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रत्नागिरी जेट्स संघाने २० षटकात ९ बाद १४६ धावांचे आव्हान उभे केले. पॉवरप्लेमध्ये अथर्व धर्माधिकारी (७), धीरज फटांगरे (१२) हे बाद झाल्यामुळे रत्नागिरी जेट्स संघ २ बाद ४३ अशा स्थितीत होता. त्यानंतर किरण चोरमलेने अफलातून फटकेबाजी करत ३८ चेंडूत अर्धशतक साजरे केले. किरण चोरमलेने दिव्यांग हिंगणेकरच्या साथीत पाचव्या विकेटसाठी ३४ चेंडूत ४२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी करून संघाचा डाव सावरला. किरणने ४१ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. त्यात त्याने २ चौकार व ३ षटकार मारले. दिव्यांग हिंगणेकर १४ धावावर तंबूत परतला. हे दोघेही बाद झाल्यानंतर अभिषेक पवारने १० चेंडूत १ चौकार व ३ षटकाराच्या साहाय्याने २५ धावा काढून संघाला १४६ धावापर्यंत मजल मारली.

या आव्हानाचा पाठलाग करताना ओम भोसलेसा (७) रत्नागिरीच्या प्रदीप दाढेने त्रिफळा बाद केले. त्यानंतर सलामवीर पवन शहाने २२ चेंडूत ४५ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने ९ चौकार मारले. त्याचे पाच धावांनी अर्धशतक हुकले. पवन व अनिरुद्ध साबळे (१७) यांनी दुसऱ्या विकेटसाठी १९ चेंडूत २९ धावांची भागीदारी केली. नवव्या षटकात फिरकीपटू सत्यजीत बच्चावने पवन शहा (४५), सौरभ नवले (०) याला एकापाठोपाठ बाद करून सातारा वॉरियर्स संघाला अडचणीत टाकले. त्यानंतर अनिकेत पोरवाल नाबाद २७ धावा, हर्षल काटे नाबाद १६ धावा काढून संघाचा डाव सावरला. सातारा वॉरियर्स संघ १४.४ षटकात ४ बाद ११६ धावा अशा स्थितीत होता. पाऊस सुरू झाल्यामुळे खेळ थांबवण्यात आला. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार सातारा वॉरियर्स संघाने १४ धावांनी विजय मिळवला.  

संक्षिप्त धावफलक 

रत्नागिरी जेट्स: २० षटकात ९ बाद १४६ (किरण चोरमले ५२, अभिषेक पवार २५, दिव्यांग हिंगणेकर १४, धीरज पटांगरे १२, राजवर्धन हंगरगेकर ३-१४, समाधान पंगारे २-२९, वैभव दारकुंडे १-४४) पराभूत विरुद्ध सातारा वॉरियर्स : १४.४ षटकात ४ बाद ११६ (पवन शहा ४५, अनिकेत पोरवाल नाबाद २७, अनिरुद्ध साबळे १७, हर्षल काटे नाबाद १६, सत्यजीत बच्छाव ३-१३, प्रदीप दाढे १-१९). सामनावीर – राजवर्धन हंगरगेकर. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *