
लंडन ः इंग्लंडची विकेट म्हणजेच खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी उपयुक्त असल्याचे मत भारतीय संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याने व्यक्त केले आहे.
भारतीय संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा असा विश्वास आहे की इंग्लंडची विकेट म्हणजेच खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहे. तो ‘इंट्रा स्क्वॉड’ सराव सामन्यादरम्यान म्हणाला की, खेळपट्टी फिरकीपटूंसाठी चांगली आहे. फलंदाजीसाठी देखील ती चांगली आहे. पहिल्या दिवशी ओलावा होता, वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली पण जसजसा खेळ पुढे सरकला तसतसे फिरकीपटूंनी सामन्यावर वर्चस्व गाजवले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २० जूनपासून सुरुवात होईल. पहिला सामना हेडिंग्ले येथे खेळला जाईल.
जडेजा आणि कुलदीपकडे जबाबदारी
अनुभवी रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीनंतर, भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव इंग्लंड दौऱ्यावर स्वतःकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करतो. तो रवींद्र जडेजासोबत बराच वेळ घालवत आहे आणि सराव करत आहे. अश्विनच्या निवृत्तीनंतर जडेजावर अधिक जबाबदारी असेल कारण त्याला इंग्लंडमध्ये १२ कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे तर कुलदीपने या देशात एका कसोटीत फक्त नऊ षटके गोलंदाजी केली आहे.
कुलदीपचा खेळपट्टीबद्दल मोठा दावा
भारतीय संघाने २००७ पासून इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही आणि त्यासाठी संघाला कुलदीपच्या योगदानाची आवश्यकता असेल असे तज्ज्ञांचे मत आहे. तो लीड्समध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यात प्लेइंग ११ चा भाग नसू शकतो परंतु बर्मिंगहॅम, लॉर्ड्स आणि ओव्हलच्या मैदानावर तो प्रभावी ठरू शकतो. पाच सामन्यांच्या मालिकेदरम्यान खेळपट्टीकडून त्याला काही मदतीची अपेक्षा असल्याचे कुलदीप म्हणाला. तो म्हणाला, ‘या खेळपट्टीवर फिरकीपटूंसाठी उसळी आहे. आज तिसरा दिवस आहे, मला आता गोलंदाजी करायची आहे. चेंडू थोडा वळत आहे आणि मला आशा आहे की मालिकेदरम्यानही असेच असेल.’
शुभमनच्या वागण्याने कुलदीप प्रभावित
यादरम्यान, कुलदीपने कसोटी संघाचा नवीन कर्णधार शुभमन गिलचे कौतुक केले. कुलदीप म्हणाला की, ‘शुभमनला नेतृत्व कसे करायचे हे माहित आहे.’ त्याने अनेक कर्णधारांसोबत काम केले आहे, विशेषतः रोहित भाईंं सोबत आणि त्यांच्याकडून शिकला आहे. मी आतापर्यंत जे पाहिले आहे ते खूप प्रेरणादायी आहे. तो संघाचा उत्साह वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. तो या कामासाठी तयार आहे.’