
नवी दिल्ली ः आयपीएल स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणारा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठी हा त्याच्या नोटबुक सेलिब्रेशनमुळे संपूर्ण हंगामात चर्चेत राहिला. त्यामुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आहे, यावेळी त्याचे कारण स्थानिक टी २० क्रिकेट लीगमधील त्याची जादुई गोलंदाजी आहे. त्याने सलग ५ चेंडूत ५ बळी घेत विरोधी संघाला धुडकावून लावले.
या सामन्याच्या १५ व्या षटकात त्याने सलग ५ चेंडूत ५ फलंदाजांना बाद केले. त्याने पहिल्या तीन चेंडूंवर उजव्या हाताच्या फलंदाजांना बाद केले, त्यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने डाव्या हाताच्या फलंदाजाला बाद केले. त्याने पाचव्या चेंडूवर गुगली टाकली, ज्यावर फलंदाज एलबीडब्ल्यू झाला. तथापि, हा सामना आयपीएल २०२५ च्या आधीचा आहे, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोयंका यांनीही त्याचा व्हिडिओ शेअर केला.
दिल्लीत जन्मलेल्या २५ वर्षीय दिग्वेश राठीला लखनऊ सुपर जायंट्सने त्याच्या ३० लाख रुपयांच्या बेस प्राईसला खरेदी केले होते. त्याने या हंगामात १३ सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेतल्या. त्याची इकॉनॉमी ८.२५ होती. त्याने त्याच्या कारकिर्दीत एकूण १५ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर १७ विकेट्स आहेत.
अभिषेकशी वाद झाला होता
इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामात दिग्वेशवर अनेक वेळा दंड ठोठावण्यात आला होता. सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माशीही त्याचा जोरदार वाद झाला होता. अभिषेकला बाद केल्यानंतर त्याने नोटबुक सेलिब्रेशन केले, त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. यानंतर दिग्वेशवर एका सामन्यासाठी बंदी देखील घालण्यात आली.
दिग्वेश राठीचा पराक्रम
लखनौ सुपर जायंट्सने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. दिग्वेश राठीने ५ चेंडूत सलग पाच विकेट्स घेतल्या. एलएसजी संघाचे मालक संजीव गोएंका देखील त्यांच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.
संजीव गोएंका यांनी सोशल मीडियावर दिग्वेश राठीच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “मला हा व्हिडिओ सापडला ज्यामध्ये दिग्वेश राठीने प्रादेशिक स्तरावरील स्पर्धेत ५ चेंडूत ५ विकेट्स घेतल्या. आयपीएल २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्सचा उदयोन्मुख स्टार बनवणाऱ्या प्रतिभेची ही फक्त एक झलक आहे.”
दिग्वेश राठीने या सामन्यात एकूण ७ विकेट्स घेतल्या. या व्हिडिओमध्ये लीगचे नाव नमूद केलेले नाही, परंतु संजीव गोयंका यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की हा व्हिडिओ स्थानिक/प्रादेशिक स्पर्धेचा आहे. राठीने या सामन्यात ५ बळी घेतले, त्यापैकी चार फलंदाज क्लीन बोल्ड झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतले.