बुद्धिबळ स्पर्धेत भूमिका वाघले, निर्वाण शहाला विजेतेपद

  • By admin
  • June 17, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

पुणे ः पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या वतीने आयोजित व एमसीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एच२इ पॉवर सिस्टीम महाराष्ट्र राज्य ११ वर्षांखालील खुल्या व मुलींच्या गटात फिडे रेटेड निवड बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात मुंबई शहरच्या निर्वाण शहाने, मुलींच्या गटात छत्रपती संभाजीनगरच्या भूमिका वाघलेने विजेतेपद संपादन केले.

कर्वे रोड येथील श्री गणेश सभागृह या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत खुल्या गटात पहिल्या पटावरील लढतीत मुंबई शहराच्या निर्वाण शहाने मुंबई उपनगरच्या विहान अग्रवालचा पराभव करून ७.५ गुणांसह विजेतेपद पटकावले. मुंबई उपनगरच्या विहान अग्रवालने ७ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. कोल्हापूरच्या विवान सोनी याने मुंबई शहराच्या रेयांश वेंकटला बरोबरीत रोखले व ७ गुण (४०.५ बुकोल्स कट) सह तिसरा क्रमांक पटकावला.

मुलींच्या गटात छत्रपती संभाजीनगरच्या भूमिका वाघलेने रायगडच्या प्रिशा घोलपला बरोबरीत रोखले व ७ गुणांसह विजेतेपदाचा मान पटकावला. मुंबई शहरच्या त्वेशा जैनने साताऱ्याच्या रेवा चरणकरचा पराभव करून ६.५ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. तर, ठाण्याच्या कार्तिक उत्तराने मुंबई शहराच्या मृण्मयी डावरेचा पराभव करून ६.५ गुण व ३७.५ बुकोल्स कट गुण सरासरीच्या जोरावर तिसरे स्थान पटकावले.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूना करंडक व रोख रकमेची अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आंतरराष्ट्रीय मास्टर प्रथमेश मोकल आणि आबासाहेब गरवारे कॉलेजचे प्राध्यापक डॉ सुधीर गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक प्रकाश कुंटे, चीफ आर्बिटर आयए अथर्व गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *