‘औरत है तो भारत है’ उपक्रमांतर्गत कर्तबगार महिलांचा सन्मान

  • By admin
  • June 17, 2025
  • 0
  • 40 Views
Spread the love

रायगड रॉयल्स व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा विशेष उपक्रम

पुणे : महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व रायगड रॉयल्स संघाच्या संयुक्त विद्यमाने एमसीए इंटरनॅशनल स्टेडियम, गहुंजे पुणे येथे ‘औरत है तो भारत है’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करणे आणि समाजातील महिलांच्या योगदानास व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता. यावेळी विविध क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या १५ हून अधिक कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन इंद्रायणी नदीवरील कुंडमळा दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आले.

सन्मानित मान्यवरांमध्ये रिटायर्ड आर्मी कॅप्टन पूजा मेहरा, सकाळ माध्यम समुहाच्या कार्यकारी संपादिका शितल पवार, पॅरा ॲथलीट भाग्यश्री जाधव, महाराष्ट्र केसरी विजेती प्रतीक्षा बागडे, राज्य युवा धोरण समिती सदस्य तपस्वी गोंधळी, ॲक्सेस टू जस्टीस संकल्पनेच्या ॲड परिक्रमा खोत, मुंबई हायकोर्ट वकील ॲड कल्याणी माणगावे, एबीपी माझा रिपोर्टर शिवनी पांढरे, महिला उद्योग संस्था ‘युनिक कलेक्शन’च्या कोमल कलगुटगी, समाजातल्या वस्तीतील मुलींना संघटित करून त्यांना उद्योजक बनवणाऱ्या धनश्री हेंद्रे, अरुणा एज्युकेशन फाउंडेशनच्या संस्थापक ॲड. अभिधा निफाडे, अक्षया शेडगे, ललिता बाबर, तसेच नीता लाड यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या विशेष क्षणांपैकी एक म्हणजे रायगड रॉयल्स व कोल्हापूर टस्कर्स संघातील खेळाडू त्यांच्या मातांसोबत स्टेडियममध्ये उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या आईच्या नावाची जर्सी परिधान करून सामना खेळला, ही बाब उपस्थितांना भावूक करणारी ठरली.

कार्यक्रमाला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मानद सचिव ॲड कमलेश पिसाळ, रायगड रॉयल्स संघमालक आलिशा बाहेती व कपिल बाहेती, अपेक्स समिती सदस्य कल्पना तापीकर, शुभेंद्र भांडारकर, सुनील मुथा, रणजीत खिरीड, सुशील शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना एमसीएचे मानद सचिव ॲड कमलेश पिसाळ म्हणाले की, “या उपक्रमामुळे महिलांच्या कार्याची दखल घेता आली. समाजात आई, बहिण, अर्धांगिनी, मुलगी या नात्यांमुळे प्रत्येक पुरुष घडतो. रायगड रॉयल्सने घेतलेला पुढाकार आणि महिला क्रिकेटला दिलेले प्रोत्साहन निश्चितच अनुकरणीय आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे सुरू झालेली वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग हीदेखील महिलांना समान संधी देणारा पुढचा टप्पा आहे.”

‘औरत है तो भारत है’ या उपक्रमाद्वारे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि रायगड रॉयल्स संघाने महिला सक्षमीकरण व त्यांच्यावरील श्रद्धा व्यक्त करत एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *