
सचिन भोसले, किरण चोरमले, दिव्यांग हिंगणेकर, यश नाहरची चमकदार कामगिरी
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत साखळी फेरीत यश नाहर (५९धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीसह सचिन भोसले (४-३८) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ४ एस पुणेरी बाप्पा संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा डक वर्थ लुईस नियमानुसार ५ गडी राखून विजय मिळवत प्ले ऑफ मध्ये प्रवेश निश्चित केला.

गुणतालिकेत ईगल नाशिक टायटन्स संघाने ८ सामन्यात ५ विजय, १ पराभव, १२ गुणांसह अव्वल स्थानी असून ४ एस पुणेरी बाप्पा संघ ९ सामन्यात ४ विजय, २ पराभव, ११ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत. या दोन्ही संघांनी प्ले ऑफमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ४ एस पुणेरी बाप्पा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. धीरज फटांगरे (०) खाते न उघडताच तंबूत परतला. पुणेरी बाप्पाच्या सचिन भोसलेने त्याला झेलबाद केले व संघाला पहिला धक्का दिला. अथर्व धर्माधिकारीने २० धावा केल्या. त्याने तीन चौकार मारले. किरण चोरमले व अथर्व धर्माधिकारी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३० चेंडूत ५० धावांची भागीदारी केली. किरण चोरमलेने २३ चेंडूत ३७ धावांची आक्रमक खेळी केली. त्यात त्याने ४ चौकार व २ षटकार खेचले. चोरटी धाव घेत असताना किरणला निकित धुमाळ याने स्वत:च्या गोलंदाजीवर धावबाद केले.

दिव्यांग हिंगणेकरने ३३ चेंडूत ४३ धावांची खेळी करून संघाची धावगती वाढवली. दिव्यांगने ३ चौकार व २ षटकार मारले. त्याला अभिषेक पवारने २०, निखिल नाईकने १३ धावा काढून साथ दिली. शेवटच्या रत्नागिरी जेट्सने १२ चेंडूत ४ गडी गमावल्या. त्यामुळे निर्धारित षटकात रत्नागिरी संघाला ९ बाद १५४ धावाचे आव्हान उभारता आले. पुणेरी बाप्पाकडून सचिन भोसले सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३८ धावात ४ बळी टिपले.
पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना १६ षटकांचा खेळवण्यात आला. विजयासाठी ४ एस पुणेरी बाप्पा संघाला १६ षटकात १३२ धावांचे आव्हान होते. मुर्तुझा ट्रंकवाला ७ धावांवर बाद झाला. यश नाहर व मुर्तुझा या जोडीने २८ चेंडूत ३८ धावांची भागीदारी केली. पॉवरप्लेमध्ये पुणेरी बाप्पा संघाने १ गड्याच्या बदल्यात ४८ धावा काढून सामन्यावर आपली पकड भक्कम केली. नवव्या षटकातील अखेरच्या चेंडुवर ऋषिकेश सोनावणे २० धावांवर बाद झाला. सत्यजित बच्छाव याने त्याला झेलबाद केले. यश नाहरने एका बाजूने खेळताना ३६ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. यश ४३ चेंडूत ५९ धावा काढून बाद झाला. त्याने ३ चौकार व ४ षटकार मारले. यश क्षीरसागरने १८ चेंडूत ३ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ३१ धावा काढून यश नाहरला साथ दिली. या जोडीने ३० चेंडूत ४७ धावांची भागीदारी करून संघाला विजयाचा पाया भक्कम केला.
शेवटच्या षटकात पुणेरी बाप्पा समोर ६ चेंडूत ५ धावा असे समीकरण होते. पहिल्याच चेंडूवर रत्नागिरीच्या विजय पावले याने सूरज शिंदेला त्रिफळा बाद केले. त्यानंतर पुढील दोन्ही चेंडूवर एक-एक धाव घेतली. रामकृष्ण घोषने पाचव्या चेंडूवर दोन धावा काढून संघाचा विजय सुकर केला. ४ एस पुणेरी बाप्पा संघाने १५.५ षटकात ५ बाद १३२ धावा करून हे आव्हान पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक
रत्नागिरी जेट्स : २० षटकात ९ बाद १५४ (दिव्यांग हिंगणेकर ४३, किरण चोरमले ३७, अथर्व धर्माधिकारी २०, अभिषेक पवार २०, सचिन भोसले ४-३८, रामकृष्ण घोष १-३३, सोहन जमाले १-१७, निकित धुमाळ १-३०, रोशन वाघसरे १-३५) पराभूत विरुद्ध ४ एस पुणेरी बाप्पा : १५.५ षटकात ५ बाद १३२ (यश नाहर ५९, यश क्षीरसागर ३१, ऋषिकेश सोनावणे २०, रामकृष्ण घोष नाबाद ६, दिव्यांग हिंगणेकर २-२६, सत्यजीत बच्छाव १-१९). सामनावीर – यश नाहर.