
सातारा वॉरियर्स संघावर दोन धावांनी मात, तनय संघवी सामनावीर
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत साखळी फेरीत सिद्धेश वीरच्या नाबाद ३३ धावांसह तनय संघवी (३-२५) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने सातारा वॉरियर्स संघाचा रोमहर्षक लढतीत अवघ्या २ धावांनी पराभव करत आपली आगेकूच कायम राखली.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सातारा वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीचा फलंदाज विकी ओस्तवाल ८ धावांवर तंबूत परतला. रायगड रॉयल्स संघ ५ षटकात १ बाद २७ धावांवर असताना पाऊस सुरू झाला.

पावसामुळे प्रत्येकी १९ षटकाचा सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रायगड संघ ५.१ षटकात १ बाद ३३ धावा अशा स्थितीत असताना पुन्हा पाऊस सुरू झाला. त्यामुळे पावसाच्या विश्रंतीनंतर हा खेळ प्रत्येकी १० षटकांचा करण्यात आला. रायगड रॉयल्स संघाने १० षटकांत ३ बाद ९३ धावा केल्या.
सिद्धेश वीरने २३ चेंडूत ३चौकार व १ षटकाराच्या मदतीने नाबाद ३३ धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. त्याला दिग्विजय पाटील १६, नीरज जोशी १२, ऋषभ राठोडने नाबाद ११ धावा काढून साथ दिली.
सातारा वॉरियर्स संघाला १० षटकात ८ बाद ९१ धावाच करता आल्या. सातारा वॉरियर्स संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पवन शहा (३), ओम भोसले (४), सौरभ नवले (९) हे झटपट बाद झाले. हर्षल काटे याने एका बाजूने लढताना चेंडूत धावांची दिलेली लढत अपुरी ठरली. त्याने १ चौकार व ४ षटकार मारले. रायगड रॉयल्स कडून तनय संघवी (३-२५), शुभम कदम (१-९), निखिल कदम (१-११), सागर जाधव (१-२३) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
संक्षिप्त धावफलक
रायगड रॉयल्स : १० षटकात ३ बाद ९३ धावा (सिद्धेश वीर नाबाद ३३, दिग्विजय पाटील १६, नीरज जोशी १२, ऋषभ राठोडने नाबाद ११, समाधान पांगारे १-१४) विजयी विरुद्ध सातारा वॉरियर्स : १० षटकात ८ बाद ९१ (हर्षल काटे ४५, वैभव चौघुले १६, तनय संघवी ३-२५, शुभम कदम १-९, निखिल कदम १-११, सागर जाधव १-२३). सामनावीर – तनय संघवी.