
अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल अकॅडमीवर विजय
पुणे ः द स्पोर्ट्स व्हिजन हब यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या फ्युचर स्टार ट्रॉफी इंडर १४ टी २० क्रिकेट स्पर्धेत पृथ्वी क्रिकेट अकादमी, पुणे संघाने विजेतेपद पटकावले.
धानोरी (पुणे) भागातील किंग्स स्पोर्ट्स क्लब मैदानावर ही स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. महाराष्ट्रातील प्रतिभावान खेळाडूंना त्यांच्या कौशल्याचे उत्तम प्रदर्शन करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ या स्पर्धेमुळे मिळाले.
अंतिम सामन्यात पृथ्वी क्रिकेट अकादमी संघाने राजस्थान रॉयल अकॅडमी, पुणे संघाचा पराभव केला. उत्कृष्ट संघभावना, उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजी अशा सांघिक कामगिरीच्या बळावर पृथ्वी अकादमीने विजेतेपद संपादन केले. राजस्थान रॉयल अकॅडमीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. राजस्थान रॉयल अकॅडमीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात नऊ बाद ९५ धावा क ाढल्या. पृथ्वी क्रिकेट अकादमीने १८ षटकात चार बाद १०० धावा फटकावत सहा विकेटने सामना जिंकला व विजेतेपद मिळवले. शैलेश कीरते याने ३१ धावांत तीन बळी घेऊन सामनावीर पुरस्कार पटकावला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अंडर १६ संघाचे निवडकर्ता व माजी रणजीपटू चेतन थोरात हे उपस्थित होते. तसेच ज्युडिशियल क्रिकेट क्लब, पुण्याचे अध्यक्ष दीपक शिंदे यांनी देखील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेचा उद्देश फक्त विजय नव्हता, तर खेळातून शिकणे, एकमेकांना साथ देणे, आणि खेळाची खरी भावना अनुभवणे होता. ही पिढीच उद्याची क्रिकेटमधील स्टार्स असतील, असे मत आयोजकांनी सांगितले.
उत्कृष्ट कामगिरी
अनय नार्वेकर (नाबाद ४९), युवराज मोरे (नाबाद ४०), सर्वेश आर (नाबाद २३), आयुष ठाकरे (२-२६) व स्वराज मोरे (१-८).
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू
सर्वोत्कृष्ट खेळाडू – ओंकार पलापुरे (राजस्थान रॉयल अकॅडमी)
फलंदाज – सार्थक कंदारे (२३० धावा, राजस्थान रॉयल अकॅडमी)
गोलंदाज ः आयुष ठाकरे (९ विकेट, राजस्थान रॉयल अकॅडमी)