ऑलिम्‍पिक दिनानिमित्त सोमवारी पुण्यात भव्‍य दौड

  • By admin
  • June 20, 2025
  • 0
  • 30 Views
Spread the love

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या उपस्‍थितीत रंगणार समांरभ; खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रात्यक्षिके

पुणे ः महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्‍या वतीने जागतिक ऑलिम्‍पिक दिनानिमित्त सोमवारी (२३ जून) पुण्यात ऑलिम्‍पिक दौड, प्रात्‍यक्षिकांचे प्रदर्शन, खेळाडूंचा गौरव अशा भरगच्‍च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुण्यातील ऑलिम्‍पिक दिन मुख्य समारंभ स प महाविद्यालयात सकाळी १० वाजता रंगणार आहे. राज्‍याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्‍या हस्‍ते ऑलिम्पियन, ध्यानचंद व अर्जुन पुरस्कार प्राप्‍त खेळाडूंना सन्मानित केले जाणार आहे. या प्रसंगी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्‍थित रहाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी दिली आहे.

समारंभाचा प्रारंभ सोमवारी सकाळी ७.३० वाजता ऑलिम्‍पिक दौडने होईल. ऐतिहासिक लाल महाल येथील बाल शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दौडची सुरुवात होईल. मर्दानी खेळ व विविध खेळांची प्रात्याक्षिके ही लाल महालात होणार आहे. आंतररष्ट्रीय खेळाडूंच्‍या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून ऑलिम्पिक दौडचा प्रारंभ होईल. २३ जून रोजी जगभर ऑलिम्‍पिक दौडचे आयोजन केले जात असते. पुण्यात २ दशकांपासून ऑलिम्‍पिक दौडची परंपरा सुरू आहे.

 ऑलिम्‍पिक दौडमध्ये  ऑलिम्पियन, आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहे.  शिवाजी रोडने दगडूशेठ गणपती समोरून लक्ष्मी रोडने अलका टॉकीज चौक , टिळक रोडने स प महाविद्यालयात दौडची सांगता होईल. ढोल ताशांच्या गजरात ऑलिम्‍पिक दौडचे स्वागत करण्यात येणार आहे. त्‍यानंतर स प महाविद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला जाईल.

 स प महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहामध्ये मुख्य समारंभात आजी-माजी ऑलिम्‍पिक विजेते, ऑलिम्पियन,, ध्यानचंद व अर्जुन पुरस्कार प्राप्‍त खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे. गणेश वंदना, मल्लखांब, योगा, जिम्नॅस्टिक, तायक्वांदो, किकबॉक्सिंग, मर्दानी खेळाचे प्रात्‍यक्षिक हे समारंभाचे वैशिष्ट असणार आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्याशी (९९६७४८७२६२) संपर्क साधावा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *