
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जागतिक योग दिनानिमित्त शनिवारी (२१ जून) योग दिनाचे आयोजन केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. बीबी का मकबरा या ठिकाणी या वर्षीचा योग दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सकाळी साडेपाच ते ७.४५ वाजेपर्यंत असेल. यात सकाळी ६.३० ते ७ या वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधन करणार आहेत. त्याचे थेट प्रक्षेपण या काळात असेल. त्यानंतर ७ ते ७.४५ वाजेपर्यंत योग उपक्रम होतील.
योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालये, क्रीडा संघटना, योग संघटना, शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट गाईड अधिकारी, कर्मचारी, खेळाडू, विद्यार्थी, योग साधक, नागरीक असे अंदाजे ७०० जण आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. बीबी का मकबरा येथे साडेपाच ते ९ या वेळेत योग नियमांचे पालन करुन योग साधना करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त योग प्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी केले आहे.