रायगड रॉयल्स संघाचा पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघावर मोठा विजय

  • By admin
  • June 21, 2025
  • 0
  • 42 Views
Spread the love

विकी ओस्तवाल, अंकित बावणेची धमाकेदार फलंदाजी
 
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत एलिमिनेटर लढतीत विकी ओस्तवाल (७४ धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचा ६ गडी राखून पराभव करत आगेकूच केली. 

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत रायगड रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने २० षटकात ७ बाद १६४ धावा केल्या. सचिन धस २३ धावांवर तंबूत परतला. पाठोपाठ विशांत मोरे (२) याला रायगडच्या तनय संघवीने झेलबाद केले. 

एकाबाजूने विकेट पडत असताना अंकित बावणेने ५० चेंडूत ५७ धावांची खेळी करून संघाचा डाव सावरला. त्यात त्याने २ चौकार व २ षटकार खेचले. अंकितने सिद्धार्थ म्हात्रेच्या समवेत तिसऱ्या विकेटसाठी  ४५ चेंडूत ४४ धावांची भागीदारी केली. सिद्धार्थ म्हात्रे २९ चेंडूत २ चौकार व १ षटकारासह ३१ धावा काढून बाद झाला. त्यानंतर आनंद ठेंगेने ६ चेंडूत नाबाद २६ धावांची आक्रमक खेळी केली. आनंदने २ चौकार व ३ षटकार मारत संघाला १६४ धावांचे लक्ष्य उभारून दिले. रायगड रॉयल्सकडून निखिल कदम (३-३५), तनय संघवी (२-३३), शुभम कदम (१-१३) यांनी सुरेख गोलंदाजी केली.

१६४ धावांचे आव्हान रायगड रॉयल्स संघाने १९.४ षटकात ४ बाद १६५ धावा करून पूर्ण केले.  दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नाट्यमय प्रकार घडला त्यात सुदैवाने कुठलीही गंभीर दुखापत झाली नाही. विकी ओस्तवाल याने आत्मन पोरे याचा चेंडू कव्हर्समध्ये मारला. विकी व सिद्धेश वीरने पहिली धाव सहज पूर्ण केली व दुसरी धाव घेण्यासाठी धावले, पण चेंडूकडे बघण्याच्या नादात दोघांचेही लक्ष समोरच्या फलंदाजाकडे नव्हते व पिचच्या मध्यावर असताना दोघांची एकमेकांना धडक झाली व दोघेही जमिनीवर कोसळले. तोपर्यंत चेंडू कोल्हापूरचा यष्टीरक्षक विशांत मोरेकडे आला होता. त्याने नॉन-स्ट्रायकर्स एन्डला धावणाऱ्या सिद्धेशला धावचीत करण्याच्या हेतूने चेंडू आत्मनकडे फेकला, पण त्याला काही तो चेंडू व्यवस्थित पकडून सिद्धेशला धावबाद करता आलं नाही आणि तोपर्यंत सिद्धेश स्वतःला सावरुन नॉन-स्ट्रायकर्स एन्डला पोहोचला होता.

सिद्धेश नाबाद आहे हे लक्षात येताच कोल्हापूरचा कर्णधार राहुल त्रिपाठीने चेंडू पकडून दुसऱ्या बाजूला असलेल्या विकीला धावबाद करायचा प्रयत्न केला. तो स्वतः चेंडू घेऊन पिचच्या मध्यापर्यंत धावला व त्याने चेंडू यष्टींवर मारला, पण त्याचा नेम चुकला व विकी देखील नाबाद राहिला. त्या नाट्यमय घडामोडीनंतर विकीच्या हनुवटीला मलमपट्टी करावी, पण तशाही परिस्थितीत त्याने झुंझार अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

सामन्यात सिद्धेश वीर व विकी ओस्तवाल या सलामी जोडीने ५२ चेंडूत ७६ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. सिद्धेश वीर २९ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ३९ धावा काढून तंबूत परतला. कोल्हापूरच्या दीपक डांगीने सिद्धेशला त्रिफळा बाद करून संघाला पहिला धक्का दिला.  सलामवीर विकी ओस्तवालने सुरेख खेळी करताना ३७ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. विकीने नीरज जोशीच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी ४७ चेंडूत ६३ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ आणून ठेवले. विकी ओस्तवालने ५४चेंडूत ७४धावांची दमदार खेळी केली. त्याने ११ चौकार व १ षटकार मारले. विकीला कोल्हापूरच्या आनंद ठेंगे याने झेलबाद केले. नीरज जोशीने २७ चेंडूत नाबाद ३७ धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. नीरजने २चौकार व २षटकार उत्तुंग ठोकले.

संक्षिप्त धावफलक : एलिमिनेटर लढत 

पीबीजी कोल्हापूर टस्कर्स : २० षटकात ७ बाद १६४ (अंकित बावणे ५७, सिद्धार्थ म्हात्रे ३१, आनंद ठेंगे नाबाद २६, सचिन धस २३, निखिल कदम ३-३५, तनय संघवी २-३३, शुभम कदम १-१३) पराभूत विरुद्ध रायगड रॉयल्स : १९.४ षटकात ४ बाद १६५ (विकी ओस्तवाल ७४, सिद्धेश वीर ३९, नीरज जोशी नाबाद ३७, दीपक डांगी १-३३, आनंद ठेंगे १-२१, सुनील यादव १-२९). सामनावीर – विकी ओस्तवाल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *