
मनमाड ः “केवळ एक दिवसापूरता योग न करता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग योग बनला पाहिजे. बुद्धी, पैसा या बरोबरच आपली शारीरिक सुदृढता ही जीवनात महत्वाची आहे. ती वाढवण्याचा आज आपण संकल्प करूया!” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक व शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण व्यवहारे यांनी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने येथे केले.
येथील छत्रे विद्यालयाच्या सीतालक्ष्मी हॉल मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी मंचावर संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक आणि पर्यवेक्षक प्रसाद पंचवाघ, शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण व्यवहारे, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, वरिष्ठ पर्यवेक्षिका संगीता पोतदार, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मोरे, बालवाडी प्रमुख गवते तसेच सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षक वृंद शिक्षकेतर, एसीसी कॅडेट व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रवीण व्यवहारे यांनी संयोजन करत सर्व योग प्रकार समजावले व प्रत्येक प्रकारचे आपल्या आरोग्यासाठीचे महत्व सांगितले. कृष्णा व्यवहारे, भाग्यश्री पवार व शाळेचे शिक्षक धनंजय भामरे यांनी केलेली आसने तसेच सर्व प्राणायाम प्रकारांचे सर्व विद्यार्थी व शिक्षक, पदाधिकारी यांनी अनुकरण करत सर्व प्रकारची आसने व प्राणायाम प्रकार केले.