
अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धा : विकी ओस्तवाल सामनावीर
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत क्वालिफायर २ लढतीत सिद्धेश वीरने केलेल्या उपयुक्त ४२ धावांच्या खेळीसह निखिल कदम (३-३२), विकी ओस्तवाल (२-१६), तनय संघवी (२-२१) यांनी केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने ४ एस पुणेरी बाप्पा संघाचा २५ धावांनी पराभव करून दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. रायगड रॉयल्स संघाने एमपीएल स्पर्धेत पहिल्यादांच अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ४ एस पुणेरी बाप्पा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ४ एस पुणेरी बाप्पा संघाच्या रामकृष्ण घोष (२-२५), निकित धुमाळ (२-३९), यश क्षीरसागर (१-८), सोहन जमाले (१-१३), रोशन वाघसरे (१-१८), सचिन भोसले (१-२५) यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे रायगड रॉयल्स संघाला २० षटकात ९ बाद १३३ धावाच करता आल्या. विकी ओस्तवाल ११ धावांवर बाद झाला. पुणेरी बाप्पाच्या सचिन भोसले याने विकीला त्रिफळा बाद केले.
स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या सिद्धेश वीरने ४० चेंडूत ४२ धावांची संयमी खेळी केली. त्याने ४ चौकार व १ षटकार मारला. सिद्धेशला ओंकार खाटपेने २१ धावा काढून साथ दिली. सिद्धेशने ओंकार खाटपेच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी ३७ चेंडूत ४२ धावाची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. पण ओंकार खाटपेला सोहन जमालेने झेलबाद केले. त्यानंतर मधल्या व तळाच्या फळीतील फलंदाज ऋषभ राठोड (५), नीरज जोशी (५), हर्ष संघवी (३), अजय बोरुडे (१०), हर्ष मोगवीरा (८), तनय संघवी (७) हे अपयशी ठरले.
१३४ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या ४ एस पुणेरी बाप्पा संघाचा डाव १८.५ षटकात सर्वबाद १०८ धावांवर संपुष्टात आला. सलामीची जोडी यश नाहर (९), मुर्तुझा ट्रंकवाला (१) हे झटपट बाद झाले. त्यानंतर ऋषिकेश सोनावणे ३० चेंडूत ५चौकारांसह ३० धावा, तर यश क्षीरसागरने १० चेंडूत १३ धावा काढून थोडासा प्रतिकार केला. ऋषिकेश सोनावणेला चोरटी धाव घेताना अजय बोरुडेने धावबाद केले व सामन्यात रोमांच वाढवला. त्यानंतर विकी ओस्तवालने यश क्षीरसागर (१३), अद्वैय शिधये (५) याला बाद करून पुणेरी बाप्पा संघाचे आव्हान अधिक खडतर केले. रामकृष्ण घोष (०), सोहन जमाले (२), सचिन भोसले (२) हे एकापाठोपाठ बाद झाल्याने पुणेरी बाप्पाची झुंज कोलमडली. नवव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या सुरज शिंदेने १६ चेंडूत २२ धावांची आक्रमक खेळी अपुरी ठरली. त्याने २ षटकार मारले. सुरजला निखिल कदमने झेलबाद करून पुणेरी बाप्पा संघाचे आव्हान संपुष्टात आणले.
रायगड रॉयल्स संघाकडून निखिल कदम (३-३२), विकी ओस्तवाल (२-१६), तनय संघवी (२-२१), शुभम कदम (१-१६), सागर जाधव (१-१९) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
संक्षिप्त धावफलक
रायगड रॉयल्स : २० षटकात ९ बाद १३३ (सिद्धेश वीर ४२, ओंकार खाटपे २१, विकी ओस्तवाल ११, अजय बोरुडे १०, रामकृष्ण घोष २-२५, निकित धुमाळ २-३९, यश क्षीरसागर १-८, सोहन जमाले १-१३, रोशन वाघसरे १-१८, सचिन भोसले १-२५) विजयी विरुद्ध ४ एस पुणेरी बाप्पा : १८.५ षटकात सर्वबाद १०८ (ऋषिकेश सोनावणे ३०, सूरज शिंदे २२, यश जाधव १४, यश क्षीरसागर १३, निखिल कदम ३-३२, विकी ओस्तवाल २-१६, तनय संघवी २-२१, शुभम कदम १-१६, सागर जाधव १-१९). सामनावीर – विकी ओस्तवाल