
मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांनी केला योगा
जळगाव ः आयुष मंत्रालय, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, मध्य रेल्वे विभाग भुसावळ आणि जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने “एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेवर आधारित भव्य योग सत्राचे आयोजन भुसावळ येथील पथज्योत रेल्वे क्रीडांगणावर करण्यात आले. या कार्यक्रमात विविध स्तरांतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या सामूहिक योग सत्रात केंद्रीय युवा व क्रीडा मंत्री रक्षा निखिल खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मंडल रेल्वे प्रबंधक इति पांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, तसेच विविध शासकीय व निमशासकीय विभागांचे अधिकारी, शाळांचे विद्यार्थी, शिक्षक ,प्राध्यापक नागरिक, रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हजारोच्या संख्येने सहभाग घेतला.
योग शिक्षिका चंचल माळी, डॉ आदित्य व डॉ शरयू यांनी विविध योगासने प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह सादर करत योगाचे आरोग्यदायी फायदे विशद केले. त्यांनी सांगितले की, योग हा केवळ व्यायाम नसून जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. तो तणावमुक्त जीवनासाठी उपयुक्त असून मानसिक संतुलन व आत्मिक शांती साधणारा मार्ग आहे.
या योग सत्रात प्राणायाम, विविध योगासनं आणि ध्यानधारणा यांचा समावेश होता. उपस्थितांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवून कार्यक्रमात एकरूपता साधली. ‘नियमित योगाभ्यास करा, निरोगी आयुष्य जगा’ हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
योग जीवनशैलीचा अविभाज्य भाग – रक्षा खडसे
योग शरीर, मन आणि आत्मा यांच्यात समतोल निर्माण करतो. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, आत्मिक समाधान आणि सकारात्मकता वाढते. त्यामुळे योग जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवावा, असे आवाहन केंद्रिय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांनी केले. यावेळी राज्याचे वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनीही योगाचे महत्व विशद केले.
भुसावळ विभागातील विविध रेल्वे डेपो, कार्यशाळा आणि कार्यालयांमध्येही योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने व रेल्वे विभागाने सोशल मीडियाच्या माध्यमातून योगाचे फायदे आणि योग दिनाचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेश प्रसारित करून व्यापक जनजागृती घडवून आणली.
भुसावळ विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.यावेळी आंध्रप्रदेशातूतील विशाखापट्टनम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आयोजित करण्यात आला होता. दूरदृष्य प्रणालीद्वारे भव्य पडद्यावर या ठिकाणी दाखविण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली साईचे पदाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, मीनल थोरात, चंचल माळी, भारत देशमुख, विशाल बोडके, सुरेश तरकुडे, जगदीश चौधरी, गोविंद सोनवणे, विनोद कुलकर्णी, उमेश मराठे, निलेश बाविस्कर, सचिन निकम, सोनल विंचवेकर, काजल भाकरे, जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण संघाचे अध्यक्ष तथा तालुका क्रीडा समन्वयक डॉ प्रदीप साखरे, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे पदाधिकारी व सर्व क्रीडा शिक्षक, क्रीडा भारती भुसावळ सर्व पदाधिकारी, रेल्वेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच भुसावळ महसूल विभाग व शिक्षण विभाग, नगरपालिका विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेल्वेचे आकाश व्यास व रीतु कुशवा यांनी केले. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी आभार मानले.