शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

  • By admin
  • June 26, 2025
  • 0
  • 35 Views
Spread the love

शिरपूर ः किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल शिरपूरमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

ऑलिम्पिक जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असून सदर स्पर्धेत जगातील सुमारे २०६ देश सहभाग नोंदवतात. सदर स्पर्धांचा विद्यार्थी जीवनावर बोधक परिणाम व्हावा व नवीन तरुण विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट जागतिक पातळीचे खेळाडू घडावेत या उदात्त हेतूने हा दिवस संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक निलेश चोपडे व समन्वयक सागर वाघ यांनी ऑलिम्पिक रिंग प्रतिमा व क्रीडा साहित्य पूजन करून केली.

संस्थेचे क्रीडा विभाग प्रमुख राकेश बोरसे यांनी ऑलिम्पिक खेळाचा उगम, इतिहास, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये घेतले जाणारे वैयक्तिक व सांघिक खेळ, पदक विजेते खेळाडू, ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंचे विक्रम आदी विषयांवर सविस्तर माहिती देऊन शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्यावत केले. ऑलिम्पिक स्पर्धेतील ध्वज, क्रीडाज्योत, चिन्हे, बोधवाक्य प्रात्यक्षिकाच्या रुपाने विद्यार्थ्यांना विस्तृत रूपाने सांगण्यात व दाखवण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात निलेश चोपडे यांनी खेळांच्या माध्यमातून एकता आणि शांतता वाढवणे तसेच शारीरिक ऍक्टिव्हिटीज आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करून, ऑलिंपिक खेळांबद्दल जागरूकता वाढवणे, तरुणांना खेळामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे ही काळाची गरज आहे याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. ऑलिम्पिक दिवसाचे अवचित्य साधून शाळेच्या क्रीडा शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी धावण्याच्या विविध शर्यती घेतल्या.

ऑलिम्पिक दिवस उत्साहात साजरा करण्यासाठी क्रीडा शिक्षक राकेश बोरसे, नूर तेली, दीपक पवार, नयना माळी, संजय मोते, कल्पेश माळी, भरत मराठे यांनी परिश्रम घेतले. शाळेच्या या आरोग्यदायी क्रीडा उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, सीमाताई रंधे, संचालक राहुल रंधे, रोहित रंधे, शशांक रंधे, संस्थेचे सर्व संचालक, व्यवस्थापक, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक तसेच संस्थेच्या इतर मान्यवरांनी व परिसरातील पालकांनी भरभरून कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *