महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटनेच्या सरचिटणीसपदी सिद्धार्थ पाटील यांची निवड

  • By admin
  • June 27, 2025
  • 0
  • 8 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः नागपूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटनेच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलच्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे सचिव सिद्धार्थ पाटील यांची सरचिटणीस म्हणून निवड केली आहे.

महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटनेचे माजी सरचिटणीस श्रीकांत वाड यांनी आपल्या आरोग्यविषयक व वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा सादर केला. त्यांच्या कार्यकाळातील योगदानाची सर्व सदस्यांनी एकमुखाने प्रशंसा केली व त्यांच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. या पार्श्वभूमीवर विद्यमान सहसचिव सिद्धार्थ पाटील यांची सर्वानुमते नवे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सिद्धार्थ पाटील यांनी गेल्या काही वर्षांमध्ये संघटनेच्या कार्यात अत्यंत सक्रिय सहभाग घेतला असून त्यांच्या संघटनात्मक कौशल्यामुळे विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले गेले आहेत. सिद्धार्थ पाटील यांच्या या निवडीचे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून, विशेषतः खेळाडू, प्रशिक्षक, पदाधिकारी व बॅडमिंटनप्रेमींनी जल्लोषात स्वागत केले आहे.

सिद्धार्थ पाटील यांचा राज्य सचिव म्हणून पदभार स्वीकारणे हे मराठवाडा विभागासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे, कारण प्रथमच या विभागातून कुणाला राज्य सरचिटणीसपदाचा मान मिळाला आहे. संघटनेचे अध्यक्ष अरुण लखाणी व वरिष्ठ उपाध्यक्ष शिरिष बोराळकर यांनी सिद्धार्थ पाटील यांचे अभिनंदन करत, त्यांच्या नेतृत्वात संघटना आणखी बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला.
नवीन सरचिटणीस सिद्धार्थ पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटना नवनवीन शिखरे गाठेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.

सिद्धार्थ पाटील यांच्या निवडीबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्हा शटल बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष विरेन पाटील, दिनकर तेलंग, नितीन इंगोले, मिलिंद देशमुख, अतुल कुळकर्णी, प्रभाकर रापतवार, जावेद पठाण, हिमांशु गोडबोले आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *