इंग्लंडचा शेवटच्या षटकात रोमांचक विजय 

  • By admin
  • July 1, 2025
  • 0
  • 7 Views
Spread the love

वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी व्यर्थ

लंडन ः वैभव सूर्यवंशीच्या तुफानी फलंदाजीनंतरही भारतीय अंडर  १९ संघाला दुसऱया एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमांचक लढतीत इंग्लंडने अखेर एक विकेटने सामना जिंकून १-१ अशी बरोबरी साधली. 

भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघासोबतच भारताचा १९ वर्षांखालील संघही सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. वरिष्ठ संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे, तर १९ वर्षांखालील संघ पाच सामन्यांची युवा एकदिवसीय मालिका खेळण्यात व्यस्त आहे. १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व आयुष म्हात्रे यांच्या हाती आहे. युवा एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना नॉर्थम्प्टन येथील काउंटी मैदानावर खेळवण्यात आला. इंग्लंडने हा रोमांचक सामना १ विकेटने जिंकला. या विजयासह, पाच सामन्यांची ही मालिका आता १-१ अशी बरोबरीत पोहोचली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात वादळी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीने दुसऱ्या सामन्यातही चांगली फलंदाजी केली, परंतु यावेळी तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा वादळी खेळी 
इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले. डावाच्या पहिल्याच चेंडूवर भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे याला एएम फिंचने बाद केले. कर्णधार बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशीने विहान मल्होत्रासोबत संघाची सूत्रे हाती घेतली. दोन्ही फलंदाजांनी काही उत्तम फटके मारले, पण त्यांना अर्धशतक पूर्ण करता आले नाही. सूर्यवंशीने ३४ चेंडूत पाच चौकार आणि ३ षटकारांसह ४५ धावांची शानदार खेळी केली. त्याच वेळी, विहान मल्होत्रा ६८ चेंडूत ४९ धावा करून बाद झाला. मधल्या फळीत राहुल कुमारने ४७ धावा केल्या, तर कनिष्क चौहाननेही ४५ धावांचे योगदान दिले. शेवटी, भारतीय संघ ४९ षटकात २९० धावा करून सर्वबाद झाला.

इंग्लंडच्या कर्णधाराचे शानदार शतक

२९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवातही चांगली झाली नाही. संघाला पहिला धक्का फक्त ७ धावांवर बसला, जेव्हा सलामीवीर बेन डॉकिन्स ७ धावा काढून युधजीत गुहाने त्याला झेलबाद केले. काही वेळातच संघाचे टॉप-३ फलंदाज ४७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. असे वाटत होते की येथून टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल. पण त्यानंतर, ५ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडच्या कर्णधार थॉमस रेव्हने शतक झळकावले आणि इंग्लंडला सामन्यात परत आणले. त्याने ८९ चेंडूत १३१ धावांची खेळी केली, ज्यामध्ये १६ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. तो बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव पुन्हा एकदा डगमगला. संघाचे ९ फलंदाज २७९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. पण शेवटच्या षटकात इंग्लंडने ७ धावा केल्या आणि या सामन्यात एका विकेटने रोमांचक विजय मिळवला. आरएस अँब्रिसने भारताकडून सर्वाधिक ४ बळी घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *