
परभणी ः चंद्रपूर येथे नुकत्याच झालेल्या वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेमध्ये परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाच महिला बॉक्सिंग खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदक व ४ कांस्यपदक अशी एकूण पाच पदके जिंकली.
या स्पर्धेत पुनम गोधम हिने ७०-७५ किलो वजन गटात शानदार कामगिरी बजावत रौप्यपदक पटकावले. तसेच मोनाली धनगर (४५-४८ किलो), गौरी आगळे (७५-८० किलो), गायत्री आगळे (८० प्लस किलो) व सलोनी सालमे (६६-७० किलो) यांनी कांस्यपदक जिंकले.
या पदक विजेत्या खेळाडूंना धनंजय बनसोडे आणि राष्ट्रीय खेळाडू मोनाली धनगर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. खेळाडूंच्या या चमकदार कामगिरीबद्दल परभणी जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष आमदार डॉ राहुल पाटील व पदाधिकारी, परभणी महानगर बाॅक्सिंग संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांनी अभिनंदन केले आहे.