
ब्रिस्टल ः भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या टी २० मालिकेतील दुसरा सामना २४ धावांनी जिंकला. या सामन्यात भारतीय संघाची २१ वर्षीय स्टार यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोष हिने विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
ब्रिस्टल मैदानावर खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या टी २० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत १८१ धावा केल्या, त्यामध्ये २० चेंडूत ६ चौकारांसह रिचाची ३२ धावांची नाबाद खेळी तिच्या बॅटमधून दिसून आली.
१००० धावा पूर्ण
रिचा घोषने इंग्लंड महिला संघाविरुद्ध ३२ धावांच्या खेळीच्या जोरावर टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या. रिचा आता पूर्ण सदस्य देशांमध्ये सर्वात कमी चेंडूत टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करणारी खेळाडू बनली आहे. रिचाने हा आकडा फक्त ७०२ चेंडूत गाठला, तर यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघातील खेळाडू क्लोई ट्रेयॉनच्या नावावर होता, ज्याने ७२० चेंडूत टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १००० धावा पूर्ण केल्या. पूर्ण आणि पूर्ण सदस्य नसलेल्या देशांमध्ये पाहिले तर, रिचा आयल ऑफ मॅनच्या लुसी बार्नेटनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. लुसीने ७०० चेंडूत टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात तिच्या हजार धावा पूर्ण केल्या.
रिचा घोषची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
आक्रमक विकेटकीपर-फलंदाज रिचा घोषच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर, तिने २०२० मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी भारतीय संघासाठी पहिला सामना खेळला. रिचाने आतापर्यंत ६४ टी २० सामन्यांपैकी ५३ डावांमध्ये फलंदाजी करताना २७.८१ च्या सरासरीने १०२९ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये २ अर्धशतकांच्या डावांचा समावेश आहे. याशिवाय, रिचाने ३७ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने देखील खेळले आहेत. रिचाने एकदिवसीय सामन्यात ८०० आणि कसोटी सामन्यात १५१ धावा केल्या आहे.