राज्य सेपक टकरा स्पर्धेत नाशिक, नागपूरला विजेतेपद

  • By admin
  • July 2, 2025
  • 0
  • 67 Views
Spread the love

नाशिक ः नाशिक जिल्हा सेपक टकरा असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र सेपक टकरा असोसिएशनच्या मान्यतेने नाशिकच्या पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुलात वरिष्ठ गटाच्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महिला गटात नाशिक संघाने तर पुरुष गटात नागपूर संघाने विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत महिलांमधे यजमान नाशिकच्या महिला संघाने अमरावती संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. तर पुरुषांमध्ये नागपूरच्या संघाने वर्धा संघावर विजय मिळवत या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले.

नाशिक संघाची कर्णधार राष्ट्रीय खेळाडू हंसिनी जाधव, प्रिया घरटे, वेदिका महाले, आदिश्री बिरारी, प्रतीक्षा महाले आणि दिया महाले यांचा समावेश असलेल्या नाशिकच्या महिला संघाने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत अंतिम लढतीत अमरावतीच्या संघावर प्रथमपासून दबाव राखत पहिला सेट २१-१४ असा जिंकून आघाडी मिळविली. तर दुसऱ्या सेटमध्येही नाशिकच्या संघाच्या खेळाडूंनी एकमेकांमध्ये चांगला समन्वय राखत दुसरा सेटही २१- १७ असा जिंकून सरळ दोन सेटमध्ये विजय प्राप्त करून विजेतेपद आपल्या नांवे केले. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या पुणे आणि सोलापूर या संघांना संयुक्त तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

पुरुषांच्या गटामध्ये बलाढ्य नागपूरच्या संघाने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी वर्धा संघावर २-१ अशी मात करून विजेतेपद पटकावले. चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत नागपूर संघाने पहिला सेट २१- १६ अशा जिंकून आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये वर्धा संघाने चांगला संघर्ष करत हा सेट २१-१८ असा जिंकून १-१ अशा बरोबरी साधली. त्यानंतरही तिसऱ्या सेटमध्ये वर्धा संघाने ९-७ अशी आघाडी घेतली होती. मात्र नागपूरच्या संघातील अनुभवी खेळाडूंनी संयमाने खेळ करत ही आघाडी मोडून काढत १६-१६ अशी बरोबरी साधली. त्यानंतरही त्यांनी हीच लय कायं राखत हा निर्णायक सेट २१- १८ असा जिंकून या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. पुरुष गटात जळगाव आणि नांदेड यांना संयुक्त तिसरा क्रमांक मिळाला.

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर सिग, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस प्रमोद जाधव, क्रीडा संघटक अशोक दुधारे, महाराष्ट्र सेपक टकरा असोसिएशनचे सरचिटणीस योगेंद्र पांडे, तांत्रिक समितीचे प्रमुख विनय मुन, नाशिक जिल्हा सेपक टकरा असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर, या स्पर्धेचे आयोजन प्रमुख आणि सचिव दीपक निकम, मराठा महासंघाचे युवा अध्यक्ष व्यंकटेश मोरे, गणेश माळवे, डॉ हनुमंत लुंगे, आनंद खरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी सचिव दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश वाघ, योगेश पाटील, ज्योती निकम, आनंद चकोर, प्रवीण घोगरे, शैलेश रकिबे, सतीश बोरा आणि सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले.

स्पर्धेचा अंतिम निकाल

पुरुष गट – १. नागपूर, २. वर्धा, ३. जळगाव आणि नांदेड.

महिला गट – १. नाशिक, २. अमरावती, ३. पुणे आणि सोलापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *